भुसावळसह जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा : नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस 10 ऑगस्टपासून धावणार
भुसावळात दाखविणार हिरवा झेंडा : भुसावळातील प्रवाशांना पुण्यासाठी दुपारी 2.55 वाजता गाडी
Nagpur-Pune Vande Bharat Express भुसावळ (7 ऑगस्ट 2025) : नागपूर (अजनी)- पुणे मार्गावर ‘वंदे भारत एक्स्प्रेस रविवार, 10 ऑगस्टपासून धावणार आहे. या गाडीला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्यासह मान्यवर हिरवा झेंडा दाखवतील. रेल्वे बोर्डाने या गाडीला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ऑनलाईन हिरवा झेंडा दाखवून या सेवेचा शुभारंभ होणार आहे.
नागपूरहून पुणे जाण्यासाठी 13 तास वेळ लागतो, मात्र, या गाडीने 12 तासात प्रवासी पोहोचणार आहे, यामुळे एक तासाचा वेळ वाचणार आहे. भुसावळातून धावणारी ही पहिलीच वंदे भारत एक्स्प्रेस आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी या गाडीची मागणी रेल्वे मंत्र्यांकडे केली होती. या मागणीला यश मिळून प्रवाशांची प्रतीक्षा आता संपली आहे. ही गाडी पुणे ते नागपूर अवघ्या 12 तासांत अंतर पूर्ण करणार असून, सध्या धावणार्या हावडा-दुरांतोच्या तुलनेत ही एक तास जलद असेल. ही गाडी पुण्याहून सकाळी 6.20 वाजता सुटून सायंकाळी 6.20 ला अजनीला पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात सकाळी 9.20 वाजता अजनीहून सुटून रात्री 9.30 वाजता पुण्याला पोहोचेल. या एक्स्प्रेसला दौड कॉर्डलाइन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा आणि वर्धा येथे थांबा असणार आहे.
भुसावळ, जळगाव येथील प्रवाशांना पुण्यात जाण्यासाठी दुपारच्या वेळेस सुध्दा आता या गाडीच्या माध्यमातून सुविधा मिळणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून या गाडीच्या उदघाटनासाठी तयारी सुरू केली आहे.
रविवार, 10 ऑगस्ट रोजी दुपारी 2.55 वाजता या गाडीला भुसावळ जंक्शनवरून केद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री संजय सावकारे हे हिरवा झेंडा दाखविणार आहे. यामुळे ही गाडी जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना फायदेशीर ठरणार आहे.
गेल्या अनेक दिवसांची मागणी
मध्य रेल्वेतील जंक्शन म्हणून भुसावळ विभागाची ओळख आहे, कोलकोत्ता आणि मध्य प्रदेशाला जोडणारा हा विभाग आहे, येथून वंदे भारत सुरू करावी, अशी मागणी होत होती. रेल्वे मंत्रालयातर्फे या गाडीला हिरवा कंदील दाखविला आहे. यामुळे भुसावळ विभागातून धावणारी ही पहिलीच वंदे भारत एक्स्प्रेस राहणार आहे. प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.




