वडकीत शेतकरी शाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
शेतकर्यांचा आत्मविकास घडवणारा उपक्रम
पुणे (7 ऑगस्ट 2025) : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी ग्रामीण उद्यान विद्या व औद्योगिक कार्यानुभव अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी शाळेला शेतकर्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमात विविध विषयांवर शेतकर्यांना माहिती व मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने झाली .त्यानंतर गावच्या सरपंच व शेतकरी यांनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.महानंद माने होते. त्यांनी विद्यापीठाचे सुधारित तंत्रज्ञान व त्यांचे महत्त्व यावर माहिती दिली.

सुधारित भाजीपाला उत्पादन तंत्र आणि हरळी व लव्हाळा यांचे एकात्मिक तन व्यवस्थापन याबद्दल सखोल मार्गदर्शन सहयोगी संशोधन संचालक, गणेश खिंड, पुणे डॉ.भालेकर यांनी केले. त्यानंतर सहाय्यक प्राध्यापक कीटकशास्त्र विभागीय कृषी संशोधन केंद्र डॉ.बनसोडे (गणेश खिंड, पुणे) यांनी शेंडे पोखरणारी अळी, करपा, फुल कीड, तुडतुडे, पिठ्या ढेकूण, हुमणी यांचा भाजीपाला व फळ पिकावरील प्रादुर्भाव व त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.
सहाय्यक प्राध्यापक मृदाशास्त्र, उद्यानविद्या महाविद्यालय डॉ.श्रद्धा वाबळे यांनी मृदा पत्रिका वाचन तसेच नत्र स्थिरीकरणाचे महत्त्व याबद्दल माहिती दिली व माने यांच्याहस्ते शेतकर्यांना मृदा पत्रिका वाटप करण्यात आल्या
सूत्रसंचालन प्रियंका चव्हाण, सानिका कांबळे यांनी तर प्रास्ताविक तनया काळे व श्रद्धा ढोकले यांनी केले. विद्यापीठाची ओळख वैष्णवी बनकर यांनी दिली. यशस्वीतेसाठी पायल गोरे, राजेश्वरी गोरे, धीरज खर्डे, चिन्मय चव्हाण, आर्यन कोंडार, स्वप्नील गुंडाळे, प्रसाद गोडसे, अपूर्व बोरुटे, विद्यार्थी प्रतिनिधी मेहुल भालेराव व विद्यार्थिनी प्रथिनिधी: अदिती जगदाळे यांनी परिश्रम घेतले.
या शाळेमुळे शेतकर्यांमध्ये नव्या उमेदीने काम करण्याची प्रेरणा निर्माण झाली असून उपस्थित सर्व मान्यवरांचे व आयोजकांचे शेतकर्यांनी मनःपूर्वक आभार मानले. या कार्यक्रमासाठी वडकी सरपंच हंसा साबळे व शेतकरी दिगंबर जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. आभार निकिता भोसले यांनी मानले.




