बसस्थानकातील खड्डे बुजवा, वृक्षारोपण करा, परिसर सुशोभित करावा

उपमहाव्यवस्थापक श्रीकांत गभने याच्या सूचना, कर्मचार्‍यांच्या जाणून घेतल्या समस्या


भुसावळ (7 ऑगस्ट 2025) : बसस्थानकात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले असून ते तात्काळ बुजविण्याचे नियोजन करावे, बसस्थानकाच्या आवारात वृक्षारोपण करा, बसस्थानकाचा परिसर सुशोभित करावा, अश्या सूचना राज्य परिवहन महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक श्रीकांत गभने यांनी दिल्यात. त्यांनी भुसावळ बसस्थानकाची पाहणी करून वाहक-चालक यांच्या समस्यां जाणून घेतल्यात. भुसावळ बस स्थानकावर सुरू केलेल्या मोफत वैद्यकीय सेवेचे कौतुक केले.

राज्यातील सर्व बस स्थानकांमध्ये हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ,सुंदर बसस्थानक अभियान सध्या राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या दुसर्‍या टप्प्या निमित्ताने एस. टी. कर्मचार्‍यांसोबतच प्रवाशांनाही सहभागी करुन हे अभियान लोक चळवळ व्हावी, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले होते. त्यानुसार,येथील बस स्थानक स्वच्छतेच्या संदर्भात विशेष दखल घेतली आहे. तसेच येथील बसस्थानकावर प्रवाशांसाठी मोफत उपचार केद्र सुरू केल्याने या योजनेची माहिती घेत कौतुक केले.


या अभियानाच्या निमित्ताने राज्य परिवहन महामंडळाचे उप महाव्यवस्थापक श्रीकांत गभने, प्रादेशिक सांख्यिकी अधिकारी किशोर आदमाने, विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा, विभागीय लेखा अधिकारी मिलिंद सांगडे यांनी येथील बस स्थानकला भेट दिली.आगार प्रमुख राकेश शिवदे यांनी अधिकार्‍यांना माहिती दिली.अभियानाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही अधिकार्‍यांनी बसस्थानकातील स्वच्छतागृह, हिरकणी कक्ष, नियंत्रणण कक्ष, अकाऊंट विभाग, पाण्याची व्यवस्था,चालक व वाहकांसाठी असलेले विश्रांती गृह निशुल्क वैद्यकीय सेवा केंद्र आदींची पाहणी केली.

यावेळी सहाय्यक कार्यशाळा अधिकारी सागर देवकर, सुलेमान तडवी, शांताराम चौधरी, सूरज पवार, गजानन झांबरे आदी कर्मचारी तसेच प्रवासी संघटनेचे नाना पाटील, सुनील वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.

500 पेक्षा जास्त बसेस बसस्थानकावरून जाणार्‍यांची पाहणी
ज्या बस स्थानकावरुन 500 पेक्षा जास्त बसेसची ये जा सुरु असते,अशा स्थानकांचा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ,सुंदर बसस्थानक अभियानात सहभाग असल्याने ही पाहणी केल्याचे श्रीकांत गभने यांनी सांगितले. भुसावळ बस स्थानकाची इमारत जुनी असली तरी आगार व्यवस्थापक राकेश शिवदे व त्यांच्या कर्मचार्‍यांनी या ठिकाणी स्वच्छतेसह इतर सोयी, सुविधांबाबत योग्य ती काळजी घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. यानिमित्ताने श्रीकांत गभने व किशोर आदमाने यांनी बसस्थानकावरील कर्मचार्‍यांसह काही वाहक व चालकांशी संवाद साधला. त्यांना उद्भवणार्‍या समस्या व अडचणी त्यांनी जाणून घेतल्यानंतर त्या सोडविण्याच्या दृष्टीने योग्य ती दखल घेण्याचे आश्वासित केले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !