दोन हजारांची लाच भोवली : शिरपूर पंचायत समितीच्या तांत्रिक सहायकासह दोघे एसीबीच्या जाळ्यात

Two thousand rupees bribe : Two people including technical assistant of Shirpur Panchayat Samiti caught in ACB net धुळे (7 ऑगस्ट 2025) : विहिर अनुदानाचे उर्वरीत साडेतीन लाखांचे बिज मंजूर करण्यासाठी दोन हजारांची लाच मागून ती स्वीकारताना शिरपूर पंचायत समितीतील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे तांत्रिक सहाय्यक धीरज संजय भामरे (26, रा.गाव दरवाजाजवळ, नरडाणा, ता. शिंदखेडा) व तांत्रिक सहाय्यक सौरभ राजेंद्र ठाकरे (26, रा. मु.पो. मंगरुळ, ता. चोपडा) यास धुळे एसीबीने लाच स्वीकारताच अटक केली. या कारवाईने शिरपूर पंचायत समितीतील लाचखोर हादरले आहेत.
असे आहे लाच प्रकरण
40 वर्षीय तक्रारदाराची मौजे वकवाड येथे शेतजमीन आहे. या शेत जमिनीमध्ये तक्रारदाराला रोजगार हमी योजने अंतर्गत सन 2023-2024 मध्ये विहिरीसाठी चार लाखांचे अनुदान मंजूर झाले. विहिरीचे नियमानुसार काम पुर्ण झाले असून 50 हजारांचे अनुदान मिळाल्यानंतर उर्वरीत साडेतीन लाखांच्या अनुदानासाठी तक्रारदाराने शिरपूर पंचायत समितीत अभियंता धीरज भामरे यांची भेट घेतली. अनुदानाच्या मोबदल्यात व उर्वरीत अनुदानाचे बिल मंजुर करण्यासाठी दोन हजारांची लाच मागण्यात आल्याने 19 मे रोजी तक्रार देण्यात आली. पंचासमक्ष पडताळणी केली असता आरोपी भामरे याने दोन हजारांची लाच मागितले व स्वीकारण्याचे मान्य केले.
गुरुवार, 7 ऑगस्ट रोजी सापळा लावल्यानंतर तांत्रिक सहाय्यक धीरज भामरे याने लाच रक्कम सौरभ राजेंद्र ठाकरे यांच्यामार्फत लाच स्विकारली. आरोपीविरोधात शिरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, रामदास बारेला, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, चालक जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने यशस्वी केला.
