भुसावळात गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेवर बंदी : 20 फुटांपेक्षा उंच गणेशमूर्तींना मनाई
सर्व मंडळांना घ्यावी लागेल ऑनलाईन परवानगी
DJs banned in Ganeshotsav procession in Bhusawal : Ganesh idols taller than 20 feet prohibited भुसावळ (8 ऑगस्ट 2025) : आगामी गणेशोत्सवात नवीन सार्वजनिक मंडळांना मिरवणुकीची परवानगी मिळणार नाही शिवाय 20 फुटांपेक्षा उंच मूर्तींची स्थापना करता येणार नाही, मिरवणुकीत डीजेवर बंदी असेल, असा इशारा भुसावळातील पोलिस प्रशासनाने दिला आहे. शहर व बाजारपेठ पोलिस निरीक्षकांनी या संदर्भातील बैठक घेत नियमावलींची जंत्री वाचली.
गणेशोत्सव अवघ्या वीस दिवसांवर आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने सार्वजनिक गणेश मंडळांसाठी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार यंदा कोणत्याही नवीन मंडळाला मिरवणुकीची परवानगी मिळणार नाही. बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत 103, तर शहरच्या कार्यक्षेत्रात 67 अशी एकुण 170 मंडळे यंदा श्रींची स्थापना करतील. यासाठी त्यांना परवानगी बंधनकारक राहील.

सर्व मंडळांना परवानगी बंधनकारक
यंदा सर्व मंडळांना उत्सवाच्या परवानगीसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल. त्यात काही तांत्रिक अडचणी आल्या तरच पोलिस ठाण्यात ऑफलाइन अर्ज जमा करता येतील. शहरात बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत 103 सार्वजनिक, 4 खासगी गणेश मंडळे आहेत. त्यांना 6 ऑगस्टपासून अर्ज वाटप सुरू झाले. हा अर्ज भरताना धर्मादाय आयुक्त आणि पालिकेचे ना-हरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
परवानगी मिळताना मंडळांची गैरसोय टळावी यासाठी पालिका व पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून एक खिडकी योजना सुरू केली जाणार आहे. या अनुषंगाने शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक उद्धव डमाळे यांनी 71 मंडळांच्या पदाधिकार्यांची बैठक घेऊन सूचना दिल्या. त्यात यंदाच्या उत्सवासाठी तयार केलेल्या नियमावलीची माहिती दिली.
डीजे वाद्यांवर उत्सवात बंदी गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे वापरावर बंदी असेल. बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ यांनी सर्व डीजे व्यावसायिकांची बैठक घेऊन ही माहिती दिली. डीजेचा वापर केल्यास डीजे चालक आणि मंडळाच्या पदाधिकार्यांवर गुन्हा दाखल होऊ शकतो.
मूर्ती उंचीची मर्यादा
मंडळांना 20 फुटांपेक्षा उंच मूर्ती बसवता येणार नाही. कारण, उंच मूर्तींमुळे विसर्जन मिरवणुकीत वीज तारांना स्पर्श होण्याचा धोका असतो. ज्यामुळे वीजपुरवठा खंडित करावा लागतो.
वीज आणि मंडप : प्रत्येक मंडळाने विजेसाठी स्वतंत्र मीटर बसवून घ्यावे.
मंडप अशा ठिकाणी उभारावा जिथे वाहनांना आणि नागरिकांना येण्या-जाण्यासाठी अडचण होणार नाही. गुलाल, फटाके नकोच : गुलाल आणि फटाकेमुक्त गणेशोत्सव.
गुलालाऐवजी फुलांच्या पाकळ्या उधळणे. आरोग्य शिबिरे, विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप, स्पर्धा परीक्षांवर व्याख्याने.
प्रत्येक मंडळाने भाविकांची गैरसोय टाळणे व सुरक्षेसाठी स्वयंसेवक नेमावे. जास्तीत जास्त ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे. महिला, पुरुषांची दर्शनासाठी स्वतंत्र रांग करावी.




