पालिका निवडणुकीचे पडघम : भुसावळात 50 जागांपैकी 13 जागांवर ओबीसी आरक्षण

प्रभागात कमाल लोकसंख्या 7 हजार 495 : इच्छूक लागले कामाला


Municipal elections in full swing : OBC reservation in 13 out of 50 seats in Bhusawal भुसावळ (9 ऑगस्ट 2025) : ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आता 50 पैकी 13 जागांवर ओबीसी आरक्षण असेल. यातील 50 टक्के जागा महिलांसाठी आरक्षीत असतील. पालिकेने 2022 मध्ये जाहिर केलेली प्रभाग रचना ओबीसी आरक्षण वगळून होती. आता नवीन पध्दतीत 27 टक्के ओबीसी आरक्षण राहिल.

दरम्यान, 18 ते 21 ऑगस्ट दरम्यान होणार प्रारुप प्रभाग रचना सादर होणार असून यानंतर हरकतींची प्रक्रिया होऊन 26 ते 30 सप्टेंबरपर्यंत अंतीम प्रभाग रचना जाहिर केली जाणार आहे.





साडेतीन वर्षांपासून निवडणुकीला बे्रक
कोरोना महामारी व त्यानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्याने गेल्या साडेतीन वर्षांपासून पालिकेची सार्वत्रिक निवडणूक रखडली. नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2016 मध्ये झाली होती. पालिकेचा पंचवार्षिक कार्यकाळ 26 डिसेंबर 2021 रोजी संपला. सलग साडेतीन वर्षांपासून पालिकेवर प्रशासकिय राजवट कायम आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींना 27 टक्के आरक्षण देण्याचे आदेश दिले होते. यानुसारच आगामी निवडणूक होणार आहे. पालिकेत पूर्वीप्रमाणे 13 जागा ओबीसीसाठी राखीव ठेवून आगामी काळातील निवडणूका होतील. यातील 50 टक्के अर्थात 7 जागांवर ओबीसी महिलांना आरक्षण राहिल.

एक प्रभाग, दोन नगरसेवक वाढतील
अ वर्ग नगरपालिकेसाठी 1 लाख लोकसंख्येसाठी 40 तर त्यावरील प्रत्येक 8 हजार लोकसंख्येमागे एक सदस्य वाढेल. अर्थात सन 2011 च्या जगणनेनुसार भुसावळ शहराची लोकसंख्या 1 लाख 87 हजार 421 असल्याने पालिकेच्या आगामी निवडणूकीत एक प्रभाग वाढून सदस्यांची संख्या दोनने वाढणार आहे. यापूर्वी 24 प्रभाग आता 25 होतील तर 48 ऐवजी 50 सदस्य निवडून येतील.

महिलांसाठी 50 टक्के आरक्षण
आगामी निवडणूकीत 25 प्रभाग व 50 जागा असतील. 50 टक्के महिला आरक्षणानुसार 25 जागांवर महिला आरक्षण असेल. भुसावळ शहरात अनुसूचित जातींची लोकसंख्या 28 हजार 542 इतकी आहे. तर एसटी अर्थात अनुसुचित जमातीची लोकसंख्या 6 हजार 125 आहे. यानुसार अनुसूचित जातीसाठी 8 जागा, एसटी अर्थात अनुसूचित जमातीसाठी 2 जागा आरक्षीत राहतील. ओबीसीसाठी 13 जागांवर आरक्षण असेल.

सात हजार 495 मतदारांची कमाल मर्यादा
प्रभाग रचनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार भुसावळ शहराची लोकसंख्येच्या तुलनेत प्रभागांची रचना होईल. एका प्रभागात दोन सदस्य निवडून येतील, अर्थात दोन सदस्यीय प्रभाग असेल. एका प्रभागात कमाल लोकसंख्या 7 हजार 495 असेल. ती काही प्रभाग दहा टक्यांनी कमी अधिक होऊ शकेल. अर्थात जास्तीत जास्त 8244 तर कमीत कमी 6746 इतकी मतदार संख्या राहिल.

असे आहे वेळापत्रक
पालिकेत मुख्याधिकारी 18 ते 21 ऑगस्ट दरम्यान प्रारुप प्रभाग रचना प्रसिध्द करणे व हरकती मागवल्या जातील. 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान जिल्हाधिकार्‍यांकडे हरकतींवर सुनावणी होईल. 2 ते 8 सप्टेंबर दरम्यान प्रभग रचना नगर विकास विभागाकडे सादर होऊन 26 ते 30 सप्टेंबर दरम्यान अंतीम प्रभाग रचना सादर होईल.

पालिकेतील 2016 च्या निवडणूकीतील पक्षीय बलाबल असे
भाजप- 28
शिवसेना- 1
जनआधार विकास आघाडी- 19
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- 00

वेळापत्रकाप्रमाणे प्रक्रिया होणार
पालिका निवडणुकीसाठी 10 मार्च 2022 रोजी प्रभाग रचना जाहिर करण्यात आली. . ही प्रभाग रचना रद्द करुन नव्याने करण्यात आली आहे. जूनच्या निर्णयाने प्रभाग रचना नव्याने होऊन पूढील प्रक्रिया सुरु आहे. शासनाने सुधारित मुदतवाढीचे जे वेळापत्रक दिले आहे, त्यानुसार प्रभाग रचना जाहिर होईल, असे पालिकेचे उपमुख्याधिकारी परवेज अहमद म्हणाले.

 








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !