पावसाची हुलकावणी : श्रावणसरींऐवजी वैशाख वणव्याचा कहर

ऑगस्टच्या नऊ दिवसांच्या सरासरीच्या तुलनेत पर्जन्यमान 15 टक्यांच्या आत


भुसावळ (10 ऑगस्ट 2025) : श्रावण म्हणजे भक्तीसोबत पाऊस व हिरवळीचा उत्सव. मात्र यंदाच्या श्रावणात पावसाने हूलकावणी दिली आहे. जुलै महिन्यात पावसाने सरासरी ओलांडली नाही. गेल्या वर्षी जुलै महिन्यात विभागातील सर्व तालुक्यांनी पावसाची सरासरी ओलांडली होती. यंदा मात्र विभागातील सर्व तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे. सरासरीच्या तुलनेत सर्वांत कमी 43.1 टक्के पाऊस यावलमध्ये तर सर्वाधिक 78.4 टक्के पाऊस मुक्ताईनगरात झाला.

समाधानकारक पाऊस नाहीच
श्रावण महिना सुरु होऊन पंधरवडा ओलांडूनही भुसावळ विभागात समाधानकारक पाऊस नाही. ऑगस्ट महिन्यात दमदार पाऊस होतो, मात्र ऑगस्टच्या 9 दिवसांतही पावसाची ओढ कायम आहे. 1 ते 9 ऑगस्ट या नऊ दिवसांच्या सरासरीच्या तुलनेत मुक्ताईनगरात सरासरीच्या तुलनेत 61.5 टक्के पाऊस झाला. तर भुसावळमध्ये 12 टक्के, यावलमध्ये 2.5, रावेरमध्ये 14.8 व बोदवडमध्ये अवघा 7.9 टक्के पाऊस झाला आहे. भुसावळ, यावल, रावेर व बोदवड या चारही तालुक्यांत सरासरीच्या तुलनेत 15 टक्के पाऊस देखील झाला नाही.




उच्च आर्द्रतेमुळे उकाडा
भुसावळ विभागात पावसाने हूलकावणी दिली आहे, सोबतच आर्द्रता 60 ते 80 टक्यांपर्यंत आहे. तापमानातील वाढीमुळे वातावरणात दमटपणा वाढला. यामुळेच सध्या उकाड्याचेही प्रमाण वाढले आहे. पावसासाठी आवश्यक असलेली उर्ध्वगामी हवेची हालचाल कमी आहे. यामुळे ढग तयार होतात, परंतु ते पावसात रूपांतरित होत नाहीत, हवामान अभ्यासक नीलेश गोरे यांनी सांगितले.

मान्सून सक्रिय नाही
सध्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कोणतेही तीव्र कमी दाबाचे क्षेत्र किंवा चक्रीवादळ सक्रिय नाही. मान्सून सक्रिय होऊन पावसाला चालना मिळेल, अशी प्रक्रिया सध्या संथ आहे. मान्सून पूर्णपणे सक्रिय नसल्याने पावसाने ब्रेक घेतला आहे. याच दरम्यान आर्द्रतेमध्ये वाढ होते. यामुळे उकाडा व उष्णतेच्या चटक्यात वाढ झाली आहे.

जुलै महिन्यातील पावसाची स्थिती
तालुका — सरासरी पर्जन्य — झालेला पाऊस — टक्केवारी — गतवर्षाची टक्केवारी
भुसावळ — 195.1 — 121.3 — 62.2 —- 141.7
यावल —- 204.9 —– 92.4 —- 45.1 — 123.0
रावेर — 183.0 —- 118.2 — 64.6 — 99.5
मुक्ताईनगर — 175.9 — 137.9 — 78.4 — 102.7
बोदवड — 203.6 — 151.2 — 74.3 — 141.1

तीन दिवस हलक्या पावसाचा अंदाज
भुसावळ विभागात 11 ते 12 ऑगस्ट दरम्यान हलक्या पावसाची शक्यता आहे. या कालावधीत वाढीव तापमान व उकाडा जाणवेल. दुपारच्या वेळेस गर्मी हैराण करेल, या स्थितीत काही बदल होईल, असे चित्र सध्या तरी नाही, असे हवामान अभ्यासक नीलेश गोरे ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना म्हणाले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !