भुसावळात कापडी पिशव्यांच्या वाटपातून प्लास्टिक मुक्तीचा संदेश
पर्यावरण सखी मंचचा स्तुत्य उपक्रम ः सहा महिन्यात 1200 कापडी पिशव्याचे वितरण
The message of plastic freedom through the distribution of cloth bags in Bhusawal भुसावळ (11 ऑगस्ट 2025) : शहरातील ‘पर्यावरण सखी मंच’ या सामाजिक संस्थेने प्लास्टिकमुक्त समाजाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी पाऊल उचलले आहे. प्लास्टिकच्या वापरामुळे होणार्या पर्यावरणाच्या गंभीर र्हासाची दखल घेत संस्थेच्या महिला सदस्यांनी गेल्या सहा महिन्यांत तब्बल एक हजार 200 हून अधिक कापडी पिशव्या स्वतः तयार करून समाजात मोफत वाटप केल्या आहेत. प्लास्टिकला पर्याय म्हणून उपयुक्त ठरलेल्या या कापडी पिशव्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम अजूनही सुरूच आहे. पुढील महिन्यात आणखी 300 पिशव्यांचे वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
घरीच तयार केल्या कापडी पिशव्या
या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे महिला सदस्य स्वतः घरीच जुन्या साड्यांचा वापर करून कापडी पिशव्या तयार करतात. पर्यावरण स्नेही, टिकाऊ व पुन्हा पुन्हा वापरता येणार्या या पिशव्या केवळ उपयुक्त नाहीत, तर त्या प्लास्टिकच्या निर्बंधित कॅरीबॅग्सना योग्य असा पर्याय ठरतात. जुने कपडे व साड्यांचा पुनर्वापर केल्यामुळे कचरा कमी होतो आणि एक अर्थपूर्ण वापरही साधला जातो. पर्यावरण सखी मंचचा हा उपक्रम स्वयंस्फूर्तता, सामाजिक जबाबदारी आणि शाश्वत विकास यांचे सुंदर मिश्रण आहे. अशा प्रेरणादायी उपक्रमांची गरज आजच्या काळात अधिक आहे. हे उदाहरण इतर संस्थांसाठी आणि नागरिकांसाठी एक दिशा दाखवणारे ठरू शकते. प्रत्येक नागरिकाने या उपक्रमाचा भाग होऊन पर्यावरण रक्षणासाठी एक पाऊल पुढे टाकले पाहिजे, कारण भविष्यासाठी हरित पर्यावरण हीच खरी शाश्वत गुंतवणूक आहे.

समाजात विविध ठिकाणी वितरण
पर्यावरण सखी मंचच्या महिलांनी आठवडे बाजार, पोलीस ठाणे, अत्यंत गर्दीची ठिकाणे, तसेच शाळा-कॉलेज परिसरात जाऊन हे पिशव्यांचे वितरण केले. या उपक्रमात सहभागी झालेल्या महिलांनी नागरिकांशी थेट संवाद साधून प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन केले. कापडी पिशव्या वापराचे फायदे काय आहेत हे सुध्दा महिला सदस्या या नागरिकांना समजाऊन सांगत जनजागृतीलाही हातभार लागतो आहे.
नागरिकांना आवाहन
संस्थेच्या अध्यक्षा शालिनी वाडेकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, प्लास्टिकच्या पिशव्यांचा प्रश्न हा फक्त शहरापुरता मर्यादित नाही, तर हा जागतिक पर्यावरण समस्या आहे.प्लास्टिक वर्षानुवर्षे विघटन न होणारे असल्याने जमिनीची सुपीकता कमी होते, पाण्याचे स्रोत प्रदूषित होतात आणि जनावरांचेही आरोग्य धोक्यात येते. त्यामुळे आपण सर्वांनीच याचा वापर थांबवून कापडी पिशव्यांसारख्या पर्यायांकडे वळले पाहिजे.
पर्यावरण रक्षण आणि महिला सशक्तीकरणाचे उदाहरण
हा उपक्रम केवळ पर्यावरण रक्षणापुरता मर्यादित न राहता, तो महिला सशक्तीकरणाचेही उत्तम उदाहरण ठरत आहे. घरगुती पातळीवर सुरू झालेला हा उपक्रम आता समाजात सकारात्मक परिवर्तन घडवतो आहे. महिलांनी आपल्या कौशल्याचा आणि वेळेचा उपयोग करून समाजासाठी काहीतरी चांगले घडवून आणले आहे.




