भुसावळ स्टेशनवर ‘ऑपरेशन-यात्री सुरक्षा अंतर्गत मोबाईल चोरट्याला अटक : चार मोबाईल जप्त
Mobile thief arrested under ‘Operation-Passenger Security’ at Bhusawal station: Four mobile phones seized भुसावळ (15 ऑगस्ट 2025) : ऑपरेशन-यात्री सुरक्षा’अंतर्गत आरपीएफ पथकाने केलेल्या कारवाईत एका संशयिताला अटक करून त्याच्याकडून चार मोबाईल जप्त केले. रेल्वे स्थानक आणि रेल्वे गाड्यांमध्ये असलेल्या आरपीएफची गस्त वाढवण्यात आल्यानंतर चोरटा गवसला आहे.
काय घडले भुसावळात
बुधवार, 13 ऑगस्ट रोजी भुसावळ रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर गस्तीदरम्यान एका प्रवाशाने झोपेत असताना त्याचा मोबाईल चोरी झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता, संशयित व्यक्तीने मोबाईल चोरी करून 12137 डाउन गाडीत चढल्याचे आढळले. तत्काळ त्याचा फोटो व डब्याची माहिती बर्हाणपूर स्थानकावरील पोलिसांना देण्यात आली. बर्हाणपूर येथे एएसआय कृष्णकुमार आणि नुरे आलम यांनी त्याला ताब्यात घेतले.
बर्हाणपूरचा चोरटा जाळ्यात
भुसावळ येथे चौकशीत संशयिताचे नाव शेख सिद्दीकी शेख अकबर (30, रा. नागझेरी मोहल्ला, बर्हाणपूर) असे निष्पन्न झाले. यावेळी आरपीएफ यांनी पंचांसमक्ष तपासणीदरम्यान त्याच्याकडून विविध कंपन्यांचे 41 हजार 500 रुपये किंमतीचे चार मोबाईल जप्त करण्यात आले. संशयिताने भुसावळ स्थानकावर झोपलेल्या प्रवाशांकडील मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. लोहमार्ग पोलिसांनी त्याच्याविरुद्ध एका मोबाईल चोरीप्रकरणी गुन्हा दाखल केला असून उर्वरित तीन मोबाईलबाबत तपास केला जात असल्याचे लोहमार्ग पोलिस सूत्रांनी सांगितले.