भुसावळ शहरात दावत-ए-इस्लामी हिंदतर्फे भव्य तिरंगा रॅली

रक्तदान शिबिरात 51 युनिट रक्तसंकलन : सहभागींना मिळाले प्रमाणपत्र


Grand tricolor rally by Dawat-e-Islami Hind in Bhusawal city भुसावळ (16 ऑगस्ट 2025) : 79 वा स्वातंत्र्य दिन व 1500 वा ईद मिलादुन्नबी निमित्त दावत-ए-इस्लामी हिंद व त्यांचा सामाजिक सेवा विभाग गरीब नवाज रिलीफ फाउंडेशनतर्फे भुसावळमध्ये दोन भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी तिरंगा रॅली व दुपारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

तिरंगा रॅलीला प्रतिसाद
शुक्रवारी सकाळी 9 वाजता अमरदीप चौकातून मदरशातील शेकडो मुले पांढर्‍या वेशात व पगडीसह, हातात तिरंगा घेऊन सारे जहाँ से अच्छा हिंदोस्तां हमारा हे गीत व देशभक्तीपर घोषणांसह मार्गस्थ झाली.रॅली रेल्वे स्टेशन, मॉर्डन रोड, जाम मोहल्ला, खडका रोड मार्गे रजा टॉवर येथे समाप्त झाली। मार्गात नागरिकांनी पुष्पवृष्टी व जलपान करून सहभागींचे स्वागत केले.


रक्तदान शिबिराला प्रतिसाद
शुक्रवारी दुपारी दोन ते सायंकाळी सहा दरम्यान सुन्नी जामा मशीद, जाम मोहल्लासमोर रक्तदान शिबिर झाले. 51 बाटल्या रक्त संकलीत करण्यात आले. सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

दावत-ए-इस्लामी हिंदचे राष्ट्रीय सदस्य हाजी सलीम अत्तारी यांनी सांगितले की, अशा प्रकारचे रक्तदान शिबिर संपूर्ण भारतातील प्रत्येक राज्य व जिल्ह्यात आयोजित केले जात आहेत. या कार्यक्रमांचा उद्देश देशभक्ती, एकता, बंधुता व मानवसेवेची भावना प्रोत्साहित करणे हा आहे.

यशस्वीतेसाठी दावते इस्लामी जळगाव जिल्हाध्यक्ष जुबैर अत्तारी, जीएनआरएफ जिल्हा निरीक्षक रफिक रोशन कादरी, भुसावळ शहर निरीक्षक अब्दुल सईद, शोएब अत्तारी, हाफिज कासिम, मौलाना झुल्फिकार मिस्बाही, मौलाना साजिद, कारी खालीद, कारी इद्रीस, अझहर कादरी, खालिद अत्तारी व आसीफ अत्तारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी भारताच्या अखंडता, समृद्धी व शांततेसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !