यावल शहरात अंमली पदार्थ भस्मासुर नाटिकेद्वारे विविध ठिकाणी जनजागृती

डीवायएसपी, पोलिस निरीक्षकांच्या उपस्थितीत शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम


यावल (17 ऑगस्ट 2025) : यावल पोलिस ठाण्याच्या वतीने अंमली पदार्थाचे दुष्परिणाम या विषयावर जनजागृती करीता शनिवारी शहरात विविध कार्यक्रम घेण्यात आले. शहरातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि सरस्वती विद्यामंदिर या शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी एकत्र येऊन अंमली पदार्थाचा भस्मासूर ही नाटिका सादर करीत अंमली पदार्थ पासून होणारे दुष्परिणाम त्यापासून स्वतःचे रक्षण कसे करावे या संदर्भात माहिती दिली.

यांची होती उपस्थिती
या नाटिकेला पाहण्यासाठी फैजपूर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल बडगुजर, पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांचीदेखील उपस्थिती होती.


शहरात अंमली पदार्थ जनजागृती संदर्भात विविध उपक्रम पोलिस ठाण्याच्या वतीने राबवले जात आहेत. यावल पोलिस ठाण्याच्या वतीने अंमली पदार्थाचे दुष्परिणाम या विषयावर जनजागृती करीता विविध उपक्रम व कार्यक्रम घेतले जात आहे. या करिता येथील बस स्थानक, बुरूज चौक आणि पोलीस ठाण्या समोर शनिवारी अंमली पदार्थाचा भस्मासुर या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले.

पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे, यावल महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे, प्रा. रत्नाकर कोळी, मुख्यध्यापक एस.एम. जोशी, प्रा.डॉ.नरेंद्र महाले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी नाटिकेच्या माध्यमातून अंमली पदार्थांच्या सेवनाने होणारे दुष्परिणाम, शारीरिक आणि मानसिक तसेच कौटुंबिक होणारे नुकसान, नशा केल्याने कशाप्रकारे शारीरिक आजार जळतात, थेट कॅन्सर पर्यंत व्यक्ती जाऊन तो मरण यातना कशा भोगतो, हे नाटकेद्वारे दाखवण्यात आले. सदर नाटिका पाहण्यासाठी डीवायएसपी अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सहायक पोलिस निरीक्षक अजय वाढवे, पोलिस उपनिरीक्षक एम.जे. शेख, पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे, पोलिस नाईक पुरुषोत्तम पाटीलसह आदींची उपस्थिती होती.

या कलावंतांनी केले उत्कृष्ट सादरीकरण
महाविद्यालयाचे शंभळ वादक मुकेश मेघे, दुर्गश पाटील,दिक्षा पंडीत,नेहा पाटील,श्रध्दा पंडीत,उन्नती कोळी, दिक्षा पाटील, रिना कोल्हे तसेच सरस्वती विद्या मंदिर शाळेचे संचित कोळी, सत्यम पाटील, रूपेश पाटील,मानस पाटील व विनायक महाजन या कलावंतांनी सादरीकरण केले.

अंमली पदार्थ दुष्परिणाम विषयी जनजागृतीचे विविध कार्यक्रम
पोलीस ठाण्याच्या वतीने अमली पदार्थ दुष्परिणाम संदर्भात जनजागृती करिता रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध शाळांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविण्यात आला आहे. तसेच अंमली पदार्थ दुष्परिणाम संदर्भात शहरात विविध ठिकाणी भिंती पत्रक, हस्त पत्रक वितरण करण्याचे नियोजन असल्याचे पोलिसांनी सांगितले.

व्हाईटनरचा वापर टाळावा
विद्यार्थ्यांना घरातूनच पालकांनी व्हाईटनर चा वापर करू देऊ नये. कारण व्हाईटनरमध्ये देखील अंमली पदार्थाचे द्रव्य असतात आणि अनेक विद्यार्थी त्याचा नकळत नशा करत असतात. म्हणून प्रत्येक कुटुंबाने आपल्या पाल्यांचे दप्तर तपासले पाहिजे. व त्यांना व्हाईटनर वापरू देऊ नये. व्हाइटनर देखील ही नशा करण्याची पहिली पायरी ठरू शकते, असे प्रा.डॉ.नरेंद्र महाले यांनी प्रसंगी सांगितले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !