अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसमध्ये गुंगीच्या औषधातून प्रवाशांना लूटले : पंजाबचा आरोपी जाळ्यात

Passengers robbed of drugs in Ahmedabad-Howrah Express : Punjab accused in the net अमळनेर (21 ऑगस्ट 2025) : रेल्वे प्रवाशात बोलण्यात गुंतवून प्रवाशांना गुंगीचे औषध देत त्यांच्या साहित्याची लूटमार करण्यात आली. अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसमध्ये घडलेल्या या प्रकारानंतर पंजाबमधील संशयीताला रेल्वे सुरक्षा बलाने सुरतमध्ये ताब्यात घेतले आहे. निशांतसिंग (गुरुदासपूर, पंजाब) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या ताब्यातून सात हजार रुपये पाच मोबाईल व गुंगीचे औषध व इतर साहित्य जप्त करण्यात आले. निशांतसिंग हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे सांगण्यात आले.
काय घडले रेल्वे प्रवासात
अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसमध्ये नवापूर शहराजवळून एक पंजाबी संशयीत तीन प्रवाशांना काहीतरी पेय देत असल्याचे एका महिलेने पाहिले होते व काही वेळात तिघेही बेशुद्ध होताच आरोपीने प्रवाशांकडील साहित्य, बॅगा सोबत घेऊन खिसे चाचपडून पैसे काढत धूम ठोकली. हा प्रकार एका महिलेने पाहिल्यानंतर जितेंद्र पाटील नामक व्यक्तीला सांगताच त्यांनी अमळनेरचे आरपीएफ अधिकारी कुलभूषणसिंग चौहान यांना माहिती कळवली व त्यांनी आरोपी हा मध्येच उतरल्याने पुन्हा सुरतकडे जाण्याचा प्रयत्न करेल आणि जाण्यासाठी एकमेव मेमू असल्याचे गृहीत धरून अधिकारी सत्यजित कुमार, नंदुरबार निरीक्षक बसंतराय यांना कळवले. त्यांनी तातडीने उधना पोलिस निरीक्षक दौलतसिंग शिसोदिया यांना माहिती कळवल्यानंतर उधना स्थानकावर सापळा रचण्यात आला.
भुसावळहुन सुरत जाणारी मेमू गाडी काल सकाळी नऊ वाजता उधना दाखल होताच पोलिसांनी गाडी तपासायला सुरुवात केली. त्यात एकमेव पंजाबी व्यक्ती तीन बॅगा घेऊन जात असल्याचे दिसताच त्याच्यावर झडप घालण्यात आली. आरोपीने आपले नाव निशांतसिंग (गुरुदासपूर, पंजाब) असे सांगितले. आरोपीने रस्त्यात आपले कपडे बदलवून घेतले होते. आरोपीकडून लुटीतील मुद्देमाल, सात हजार रुपये, पाच मोबाईल व गुंगीचे औषध व इतर साहित्य जप्त करण्यात आले.
बेशुद्ध प्रवाशांवर धुळ्यात उपचार
दरम्यान, बुधवारी सकाळी 9 वाजून 20 मिनिटांनी अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस अमळनेर स्टेशनवर आल्यानंतर हेड कॉन्स्टेबल सुनीलकुमार, राकेशकुमार, राजुराम यांनी तिघा बेशुद्ध प्रवाशांना उतरवून ग्रामीण रुग्णालयात नेले. डॉ.आशिष पाटील, डॉ.जी.एम.पाटील यांनी प्राथमिक उपचार केले व अधिक उपचाराि धुळे येथील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात तिघांना हलवले. तिघे प्रवासी बेशुद्ध असल्याने त्यांची नावे अद्याप कळालेली नाहीत.