200 मीटर रस्ता तयार करण्याच्या मागणीसाठी दहा वर्षाची प्रतीक्षा भुसावळकर संतप्त

सांडपाणी, डास, सरपटणार्‍या प्राण्यांच्या वाढत्या त्रासामुळे नागरिक त्रस्त; आंदोलनाचा इशारा


भुसावळ (22 ऑगस्ट 2025) : शहरातील सतारे शिवारातील माणक बागेच्या उत्तरेकडील दुर्गा हौसिंग सोसायटी व गणेश पार्क या भागात गेल्या दहा वर्षांपासून रस्त्याची मागणी प्रलंबित आहे. केवळ 200 मीटर रस्त्याचे काम होत नसल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पालिका हद्दीबाहेरील भाग असल्याचे कारण सांगून काम टाळले जात असले तरी, इतर बाहेरील भागांत विकासकामे होत असल्याने नागरिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप या भागातील रहिवाशांनी केला आहे.

परिसरात साचतेय सांडपाणी
या परिसरात सांडपाणी थेट या भागात सोडण्यात येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. परिणामी कच्च्या रस्त्यावर डबकी साचून तीव्र दुर्गंधी पसरली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत असून, साप, विंचू, बेडूक यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे परिसरातील रहिवासी भयभीत व त्रस्त झाले आहेत.
फक्त 200 मीटर रस्ता तयार करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी वारंवार केली असूनही ती पूर्ण होत नसल्याने अखेर नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.


निवेदन देताना यांची होती उपस्थिती
यावेळी या भागातील रहिवासी किशोर अडकमाले, सीमा सिंह, अशोक शिंदे आदींसह नागरिकांनी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारेसह शासकीय अधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. मात्र, अद्याप काहीही उपाय योजना करण्यात आलेल्या नाही. या भागात जाण्यासाठी रस्ता सुध्दा नीट राहीलेला नाही. अवघ्या 200 मीटर रस्त्याच्या कामांसाठी दहा वर्षापासून या भागातील रहिवाशांना प्रतीक्षा करावी लागत असल्याने अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !