रावेर तालुक्यातील महिलांना 60 लाखांचा गंडा
Women in Raver taluka cheated of Rs 60 lakhs रावेर (22 ऑगस्ट 2025) : रावेर तालुक्यातील अनेक महिलांना बचत गटाच्या माध्यमातून सुमारे 60 लाखांचा गंडा घालण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
असे आहे प्रकरण
अजनाड, ता.रावेर येथील एका महिलेने गावातीलच अनेक महिलांच्या नावावर बोगस बचत गट स्थापन करून सरकारी आणि खाजगी बँकांमधून तब्बल 60 ते 65 लाख रुपयांचे कर्ज उचलत त्यांची फसवणूक केली. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली असून रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
रावेर तालुक्यातील अजनाड गावात राहणार्या एका महिलेने गावातीलच महिलांशी मैत्रीचे संबंध निर्माण केले. सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आणि आर्थिक मदत करण्याचे आमिष दाखवून तिने अनेक महिलांकडून त्यांचे आधार कार्ड, फोटो आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे गोळा केली. या कागदपत्रांच्या आधारे तिने महिलांना अंधारात ठेवून त्यांच्या नावे बनावट महिला बचत गट तयार केले.
या बोगस गटांच्या नावावर तिने विविध सरकारी आणि खाजगी बँकांमध्ये कर्जासाठी अर्ज केले. बँकांच्या अधिकार्यांचीही दिशाभूल करून तिने तब्बल 60 ते 65 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले. कर्जाची रक्कम स्वतःच्या खात्यात वळवून ती पसार झाली. काही महिन्यांनंतर, ज्या महिलांच्या नावे कर्ज घेण्यात आले होते, त्यांच्या घरी बँकांचे वसुली अधिकारी कर्जाच्या हप्त्यांसाठी येऊ लागले. आपण कोणतेही कर्ज घेतले नसताना आपल्या घरी वसुलीसाठी माणसे का येत आहेत, हे पाहून महिलांना धक्काच बसला. त्यांनी चौकशी केली असता, आपल्या नावावर बचत गटाच्या माध्यमातून लाखो रुपयांचे कर्ज उचलल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
महिलेविरोधात दाखल झाला गुन्हा
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलांनी एकत्र येऊन रावेर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. याप्रकरणी प्रतिभा राजेंद्र पाटील (अजनाड) तिने दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात रुपाली मुकेश तायडेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.