यावल शहरातील बोरावलगेट भागात चक्कर येवून कोसळताच गरोदर मातेचा मृत्यू
Pregnant mother dies after collapsing due to dizziness in Boravalgate area of Yaval city यावल (22 ऑगस्ट 2025) : यावल शहरातील बोरावल गेट भागात शबरी नगरात 30 वर्षीय गरोदर माता चक्कर येवून जमिनीवर कोसळली. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. तातडीने तिला यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासणी करून तिला मयत घोषित केले. मृत विवाहिता नऊ महिन्याची गरोदर होती. व तिचा मृत्यू कशामुळे झाला या करीता तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आला. याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सरीता मधुकर भील (30, यावल) असे मृताचे नाव आहे.
काय घडले यावल शहरात
शहरातील बोरावल गेट परीसरातील शबरी नगरातील रहिवासी सरीता मधुकर भील (30) ही 9 महिन्याची गर्भवती महिला तिच्या तीन मुलांसह आपल्या घरी असताना सकाळी आठ वाजेच्या सुमारास या गर्भवती असलेल्या महिलेला चक्कर आले आणि ती जमिनीवर कोसळली. हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास येताच तिला तातडीने तेथून ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून महिलेला मयत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येत ग्रामीण रुग्णालयात नागरीकांनी गर्दी केली.
मृतदेहाचे जळगावात होणार शवविच्छेदन
या प्रकरणी यावल पोलिसात मंगला भील यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार निलेश चौधरी करीत आहे. दरम्यान, मयत गर्भवती महिलेचा मृत्यू कशामुळे झाला या तपासणीकरीता महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव जिल्हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात नेण्यात आला.