दोनशे वर्षांची परंपरा : वराडसीमला शर्यतीत जोगलखेड्याच्या गजानन पाटील यांचा बैल प्रथम

साकेगावला गौरव कोळी यांचा बैल ठरला विजेता


भुसावळ (23 ऑगस्ट 2025) : भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथे गेल्या 200 वर्षाची परंपरा लाभलेल्या गाव दरवाजाच्या खिडकीतून पोळ्याच्या दिवशी बैल कुदविण्याची परंपरा कायम आहे. शुक्रवारी पोळ्याच्या दिवशी वराडसीम येथील बैल शर्यतीत जोगलखेडा येथील गजानन पाटील यांचा बैल पोळा फोडण्याचा मानकरी ठरला. तर साकेगाव येथे तीन जणांना विभागून बक्षीस देण्यात आले. तालुक्यातील साकेगाव, वराडसीमला शेतकर्‍यांमध्ये उत्साह मोठ्या प्रमाणावर होता. बैलांची स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वराडसीम व साकेगावला ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

वराडसीमच्या पोळ्याची राज्यात ख्याती
भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथील पोळा सणाला पंचक्रोशित विशेष महत्व आहे. तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागून असलेल्या पोळा सणासाठी भुसावळ शहरासह पंचक्रोशीतील अनेक जण वराडसीम येथे बैलांची स्पर्धा पाहण्यासाठी शुक्रवारी गेले होते. तेथे गाव दरवाजाच्या केवळ तीन बाय तीन फुट आकाराची खिडकीतून मानाचा बैल कुदविण्याची गेल्या 200 वर्षाची परंपरा आजही कायम आहे. या दरवाजातून बैल कुदवित पोळा फोडला जातो. येथे बैलांची पळण्याची स्पर्धा झाली. गावात कुठेही अप्रिय घटना घडू नये यासाठी तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाही तेथे मोठा बंदोबस्त तैनात केला होता. वराडसीमला दुपारी 2.30 नंतर पोळा फुटत असतो.

यांनी पटकाविला वराडसीमला मान
वराडसीम येथील गाव दरवाजाला पोळ्याच्या निमीत्ताने रंगरंगोटी केली होती. वराडसीमला गाव दरवाजाच्या केवळ तीन बाय तीन फुट आकाराची खिडकीतून जौगलखेडा येथील गजानन पाटील यांचा बैल सर्वात पहिले कुदला. त्या पाठोपाठ नामदेव पाटील यांचा बैलाचा दुसरा नंबर तर वराडसीम येथील विकास पाटील यांच्या बैलाचा तिसरा नंबर आला. लहान दरवाजातून बैल कुदविण्याची 200 वर्षाची परंपरा आहे. खिडकी उघडी ठेऊन त्यातून बैल कुदवून पोळा फोडला जातो. अशी गावातील पोळ्याची 200 वर्षांची परंपरा आजही कायम आहे.

साकेगावला साध्या पध्दतीने पोळा
तालुक्यातील साकेगाव येथे बैलपोळ्याचा सण उत्साहात पार पडला. पोळा मैदानावर बैलाची शर्यत सुरू झाली. पोळा मैदानावरून सुरू झालेली ही शर्यत गांधी चौकापर्यत असते. सुमारे अर्धा किमीचे हे अंतर आहे. तेथे नारळाचे तोरण बांधलेले असते, ज्याचा बैल सर्वात पहिले नारळ तोरण पार करून पुढे जाईल,तो मानाचा बैल मानला जातो. गौरव विकास कोळी यांचा बैल महिला आला, तसेच सागर कोळीसह अन्य दोन बैल सुध्दा बरोबरीत आले. यामुळे त्यांना बक्षिसाची रक्कम समान वाटप केली.

यांच्याहस्ते दिले बक्षीस
शर्यतीत विजयी झालेल्या बैलांच्या मालकांना सरपंच हिराबाई कोळी, उपसरपंच सचिन सपकाळे यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. यावेळी माजी सरपंच आनंदा ठाकरे, अनिल पाटील, संजय पाटील, सुभाष कोळी व भूषण राजपूत उपस्थित होते. यावेळी शेतकर्‍यांनी जल्लोष केला.

साकेगावात दोन वेळा फुटतो पोळा
साकेगावात पोळा मैदानापासून बैलांची शर्यत लागते ती गांधी चौकापर्यत जाते तर दुसरी शर्यत ही जिल्हा परिषदेच्या शाळेजवळून सुरू होते. एकामागे एक अश्या दोन शर्यती येथे होत असतात, यामुळे येथे बैलांची शर्यत पाहाण्यासाठी पंचक्रोशीतील शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. सकाळी 11 वाजता पोळा सणाला सुरूवात झाली.बैलाची शर्यत हे येथील वैशिष्ट्य आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !