नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हा : कुणाल गालफाडे


भुसावळ (24 ऑगस्ट 2025) : चार आकडी पगाराची नोकरी न करता स्वतःच उद्योग थाटून इतरांनाही रोजगार द्या व उद्योजक होण्याकडे आपला कल असावा, असे मत भुसावळातील उद्योजक व लंडन बेकरीचे संचालक कुणाल गालफाडे यांनी येथे व्यक्त केले. शहरातील के.नारखेडे विद्यालयात आयोजित ‘उद्योजक आपल्या भेटीला’ कार्यक्रमात ते शनिवार, 23 रोजी बोलत होते.

उद्योगाविषयी केले मार्गदर्शन
यावेळी दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कुणाल गालफाडे यांनी उद्योजक म्हणजे काय? उद्यमशीलतेसाठी आवश्यक गोष्टी कोणत्या? भांडवल उभारणी कशी करता येईल? विक्रीचे तंत्र इत्यादी मुद्यांवर अत्यंत मार्मिक उदाहरणांद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. संपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग करून घेतल्यामुळे हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना भावला.


उद्योजक गालफाडे शाळेचे माजी विद्यार्थी
प्रमुख अतिथी कुणाल गालफाडे हे विद्यालयाचे 2010 च्या बॅचचे आदर्श विद्यार्थी होते. या शाळेतील सर्व विद्यार्थी माझा मित्र परिवार असल्याचे त्यांनी यावेळी नम्रपणे नमूद केले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक वाय.एन.झोपे, पर्यवेक्षक एस.पी. पाठक उपस्थित होते. झोपे यांनी विद्यार्थ्यांना नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे बना, असा संदेश दिला. संस्थाध्यक्ष डॉ.मकरंद नारखेडे यांनी या विद्यार्थ्याचे कौतुक केले. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन नियोजन व यशस्वीतेसाठी शैलेंद्र वासकर, नीळकंठ खाचणे, सुरेश कापसे, माधव गरुडे यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन शैलेंद्र वासकर यांनी तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक एस.पी. पाठक यांनी मानले. संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील, शैलेंद्र महाजन, अनिल जटाळे, अविनाश चौधरी, सुहास चौधरी, एस.के.झांबरे, स्वाती इखे, जय ठाकूर, दिव्यांश शिंगणारे, शुभम आमोदकर व राहुल शिवरामे यांची उपस्थिती होती.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !