बिहारमध्ये तीन पाकिस्तानी दहशतवादी शिरले


Three Pakistani terrorists entered Bihar नवी दिल्ली (28 ऑगस्ट 2025) : बिहारमध्ये तीन पाकिस्तानी दहशतवादी शिरल्याची माहिती समोर आली असून बिहार पोलिसांच्या मुख्यालयानं अलर्ट जारी केला आहे. विशेष म्हणजे भारतीय सैन्य दलाने जम्मू काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना ठार केले असतानाचा आता बिहारमध्ये तीन दहशतवादी घुसल्याचे वृत्त आहे. एकीकडे गणेशोत्सव आणि दुसरीकडे राहुल गांधींची यात्रा सुरू असल्याने पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला आहे. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.

तीन दहशतवादी शिरल्याचा संशय
नेपाळमार्गे तीन दहशतवादी बिहारमध्ये आल्याचा संशय असून हसनैन अली, आदिल आणि उस्मान अशी तीन दहशतवाद्यांची नावे आहेत. बिहार पोलिसांनी नावासोबत दहशतवाद्यांचे फोटो जारी केले. हसनैन अली हा रावळपिंडीचा रहिवाशी आहे तर आदिल हुसैन उमरकोटचा राहणारा आहे तर मोहम्मद उस्मान बहावलपूरचा रहिवासी आहे. हे तिन्ही दहशतवादी बिहारमध्ये घुसल्याची माहिती आहे, पण ते बिहारमधील कुठल्या जिल्ह्यात किंवा कुठल्या ठिकाणी आहेत, याची माहिती नाही त्यामुळे तपास यंत्रणांकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.




पाकिस्तानमधून हे तीन दहशतवादी नेपाळमधील काठमांडूमध्ये आले, हे तिन्ही ऑगस्ट महिन्याच्या दुसर्‍याच आठवड्यात नेपाळमध्ये आले होते. त्यानंतर, गेल्याच आठवड्यात काठमांडूतून त्यांनी भारताच्या हद्दीत प्रवेश केला आहे. सध्या ते बिहारमध्येच लपून बसले आहेत

बिहार पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला आहे. ह्या दहशतवाद्यांचे टार्गेट काय आहे, ते कुठे लपले आहेत, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.दरम्यान, सध्या देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत असून ठिकठिकाणी गर्दी होत आहे. मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात गणेशोत्सवाची मोठी धूम असल्याने मुंबईतही अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राहुल गांधींची मतदार हक्क यात्रा
दरम्यान, दुसरीकडे बिहारमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मतदार हक्क यात्रा अंतिम टप्प्यात आली असून यात्रेच्या 8 व्या दिवशी, पूर्णियामध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुलेट चालवली होती. राहुल गांधींच्या बिहार यात्रेसाठीही पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे.

 













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !