पालक रागावल्याने अल्पवयीनांनी सोडले घर : सतर्क आरपीएफमुळे चौघा चिमुकल्यांची बालकल्याण समितीकडे रवानगी

Minors left home after parents got angry : Vigilant RPF sends four toddlers to Child Welfare Committee भुसावळ (29 ऑगस्ट 2025) : ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत भुसावळ व नाशिक रोड आरपीएफने मिळून दोन दिवसांत चार अल्पवयीन मुलांना सुरक्षितपणे ताब्यात घेत बालकल्याण समितीकडे सुपूर्द केले आहे. रेल्वे सुरक्षा बलाचे आयुक्त चित्रेश जोशी यांच्या सूचनेवरून संपूर्ण विभागात ही प्रक्रिया राबविली जात आहे.
नाशिक स्थानकावर सापडली तीन बालके
भुसावळ विभागातील नाशिकरोड रेल्वे स्थानकावर 26 ऑगस्ट रोजी तीन अल्पवयीन मुले रेल्वे पोलिसांना मिळाली. त्यापैकी एक मुलगी मेघना (16, रा. संभाजी नगर) ही प्लॅटफॉर्मवर रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना दिसली. त्यांनी त्या मुलीची चौकशी केली, तिची वैद्यकीय तपासणी करून नाशिकच्या महिला सदस्यांकडे सुपूर्द करण्यात आले. याच दिवशी गस्तीवर असलेल्या आरपीएफ जवानांना नाशिक रोड स्थानकावर दोन अल्पवयीन मुले मिळाली. त्यांची नावे मोतीउर (12) व आमीर (14, दोघे रा.गोवंडी, मुंबई) अशी आहेत.
घरी पालकांनी रागावताच घरातून ही मुले पळून आल्याचे त्यांनी सांगितले. दोघांच्या पालकांना संपर्क करून माहिती देण्यात आली. त्यानंतर दोन्ही मुलांना सदस्यांकडे पुढील सुरक्षिततेसाठी सुपूर्द करण्यात आले. आरपीएफकडून संपूर्ण विभागात नन्हे फरिस्ते अंतर्गत सर्वच रेल्वे स्थानकांवर लक्ष ठेवले जात आहे. असे आयुक्त चित्रेश जोशी यांनी सांगितले.