गुन्हे शाखेची दमदार कामगिरी : धुळ्यात गोळीबार करून कोट्यवधींचे सोने लुटणारी आंतरराज्यीय टोळी जाळ्यात


Crime Branch’s strong performance: Interstate gang that looted gold worth crores by firing in Dhule is caught धुळे (30 ऑगस्ट 2025) : धुळ्यात बसमधून उतरताच मुंबईतील सराफा व्यापार्‍यावर दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तीन राऊंड फायर करण्यात आले व सराफाकडील सुमारे साडेतीन किलो वजनाचे कोट्यवधींचे सोने घेवून त्रिकूट पसार झाले होते. 23 जुलै 2025 रोजी धुळ्यातील सावरकर पुतळा चौक, देवपूर येथे पडलेल्या सिनेस्टाईल दरोड्याची उकल करण्यात धुळ्यातील स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणी कुख्यात आंतराज्यीय टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून रदोन आरोपींकडून 24 लाख 51 हजार 700 रुपये किमतीचे सोन्याचे दागिणे, एक स्विफ्ट कार आणि एक गावठी पिस्टल जप्त करण्यात आली.

मोहंमद शहरेयार मोहंमद इबरार खान (24, रा.ग्राम बहरापूर, थाना मांधाता, जि.प्रतापगढ उत्तरप्रदेश, ह.मु.वडाळा, मुंबई) व दिलशान इमरान शेख (21, रा.यहियापूर, थाना दिलीपपूर, जि.प्रतापगढ, उत्तरप्रदेश, ह. मु. सुंदरबाग, कुर्ला, मुंबई) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींना उत्तरप्रदेशातून अटक करण्यात आली असून आरोपी हे कुख्यात असल्याने गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काय घडले धुळ्यात
23 जुलै 2025 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास सराफा व्यापारी विनय मुकेश जैन आणि त्याचा सहकारी कर्षण रुपाभाई मोदी (मुंबई) ही बसमधून सावरकर पुतळ्याजवळ उतरले व त्याचवेळी अचानक काळ्या रंगाच्या दुचाकीवर तोंडाला मास्क बांधून आलेल्या तिघांनी गावठी कट्ट्यातून तीन फैरी झाडत दहशत निर्माण केली व विनय जैन यांच्याकडील साडेतीन किलो वजनाचे सोन्याचे दागिणे व सोन्याच्या पावत्या असलेली काळ्याची रंगाची बॅग बळजबरीने हिसकावून पोबारा केला. याप्रकरणी तक्रारदार विनय मुकेश जैन यांच्या तक्रारीनुसार देवपूर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला.

युपीतून आवळल्या मुसक्या
समांतर तपासात गुन्हे शाखेने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही व खबर्‍यांचे नेटवर्क अ‍ॅक्टीवेट करीत आरोपी मुंबई भागातून आल्याचे निष्पन्न केले तसेच आरेापी मुंबईत ओला उबेर कंपनीत टॅक्सी चालवणारे असल्याचे निष्पन केले व आरोपी गुन्ह्यानंतर युपीत लपल्याची माहिती काढत पथकाला युपी रवाना करण्यात आली. दोन्ही आरोपींविरोधात प्रतापगढ़ (उत्तरप्रदेश) येथे खुनाचा प्रयत्न सदराखाली गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयाशी पत्रव्यवहार केल्यानंतर आरोपींना प्रतापगढ़ (उत्तरप्रदेश) येथून ट्रान्सपर करीत धुळ्याच्या गुन्ह्यात शनिवार, 23 रोजी अटक करण्यात आली.

263 ग्रॅम सोने जप्त
दोन्ही आरोपींकडे तपास करतांना त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. एकूण 262.800 ग्रॅम वजनाचे 24 लाख 51 हजार 700 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे, एक पांढर्‍या रंगाची मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट (एम. एच. 15 ई.बी.4516) नंबर असलेली कार, गावठी पिस्टल जप्त करण्यात आली.

कुख्यात आरोपींविरोधात गंभीर गुन्हे
आरोपी शहरेयार खान विरोधात मांधाता, ता.प्रतापगढ, सोराव, जि.प्रयागराज, कोतवाली नगर, जि.प्रतापगढ, पट्टी, जि.प्रतापगढ, देल्हपूर, ता.प्रतापगढ येथे प्रत्येकी एक व जेठवारा, जि.प्रतापगढ येथे दोन तसेच आरोपी दिलशान इमरान शेखविरोधात देल्हपूर, जि.प्रतापगढ, मांधाता, जि.प्रतापगढ येथे गुन्हे दाखल आहेत.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, पोलिस उपनिरीक्षक चेतन मुंढे, सहाय्यक उपनिरीक्षक सतीश जाधव, हवालदार राहुल सानप, हवालदार आरीफ पठाण, हवालदार पवन गवळी, हवालदार देवेंद्र ठाकुर, कॉन्टेबल मयूर पाटील, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय पाटील, अमोल जाधव, चालक हवालदार कैलास महाजन आदींच्या पथकाने केली.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !