भुसावळातील ‘भालचंद्र नगर’चा राजा देतोय व्यसनमुक्तीचा संदेश


भुसावळ (4 सप्टेंबर 2025) : शहरातील प्रभाकर हॉल परिसरातील भालचंद्र नगरात दरवर्षीप्रमाणे घरगुती गणेशोत्सवाची स्थापना करण्यात आली. यंदा सलग दुसर्‍या वर्षी सुध्दा गणेशोत्सवाच्या आरासमध्ये व्यसनमुक्ती वरील पोस्टर्सचे प्रदर्शन लावण्यात आले. या प्रदर्शनामुळे परिसरात आणि गणेश दर्शनासाठी येणार्‍या भाविकांमध्ये व्यसनमुक्ती संदर्भात जनजागृती होत आहे.

नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य या संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या पोस्टर्स आणि बॅनर्स च्या माध्यमातून हे जनजागृतीचे कार्य साध्य होत आहे. यासाठी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य या संस्थेसाठी नाशिक विभागीय संघटक प्रमुख म्हणून कार्यरत असणारे डॉ.दयाघन राणे यांच्या
माध्यमातून हे प्रदर्शन उपलब्ध करून दिलेले आहे.


या गणेशोत्सवाचे स्वरूप घरगुती असले तरी संपूर्ण भालचंद्र नगरवासी या गणेशोत्सवात सहभागी होत आहेत. म्हणून भजन, खेळ आणि बालगोपालांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. भालचंद्र नगर मधील प्रत्येक घरातील सर्वजण या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे सामाजिक एकता, बंधुता आणि समाज जागृतीचे उद्दिष्ट या माध्यमातून साध्य होत असताना दिसत आहे हे या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य आहे.

हा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी भालचंद्र नगरातील रहिवासी प्रा.डॉ.गजानन जाधव, अशोक चौधरी, अशोक सरोदे, निखील कोलते, चंद्रकांत चौधरी, तुषार चिंधडे, प्रमोद पाटील, बापू पाटील, पवन पाटील, जीवन पाटील, संदीप कोलते, दिलीप ढाकणे, राजेश जोशी, किशोर कांबळे, शिरीष पिंपळे, विजय महाजन, प्रा.आशिष महाजन, किशोर नारखेडे, अजय महाजन, डी.टी.किरंगे परिश्रम घेत आहेत.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !