भुसावळात साडेबारा तास चालली बाप्पांची विसर्जन मिरवणूक
मध्यरात्री 12 वाजता वाद्य बंद : पोलिसांच्या चोख बंदोबस्ताने विसर्जन निर्विघ्नपणे पडले पार
भुसावळ (8 सप्टेंबर 2025) : शहरात शनिवार, 6 सप्टेंबर रोजी लाडक्या गणपती बाप्पाला भाविकांनी भक्तीमय वातावरणात निरोप दिला. मुख्य मिरवणूक मार्गात 40 गणेश मंडळांनी सहभाग घेतला. दुपारी एक ते रात्री 1.30 वाजेपर्यंत तब्बल साडेबारा तास मिरवणूक सुरु होती. रात्री 12 वाजता वाद्य बंद करण्यात आले. यानंतर चार ते पाच गणपती विना वाद्याने जामा मशिदीजवळून पुढे केले. मोठ्या गणेशमुर्त्यांचे रविवारी सकाळी सहा वाजेपर्यंत वाघूरच्या बॅकवॉटरमध्ये विसर्जन करण्यात आले. तर तापीनदीकाठावरील महादेव व राहूल नगर घाटावर तब्बल 25 हजार घरगुती गणेशमुर्तींचे विधीवत गेल्या दहा दिवसांपासून स्थापीत गणरायला भाविकांनी शनिवारी निरोप दिली.
मुख्य मिरवणुकीला दुपारी सुरूवात
भुसावळ शहरात मुख्य मिरवणुकीला शनिवारी दुपारी एक वाजता सुरवात झाली. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, डीवायएसपी संदीप गाविीत, मुख्याधिकारी राजेंद्र फातले, बाजारपेठचे निरिक्षक राहुल वाघ आदींच्या उपस्थितीत पूजन झाले. मुख्य मिरवणुकीत 40 पेक्षा अधिक मंडळांनी सहभाग घेतला. रात्री 12 वाजता डीवायएसपी संदीप गावीत यांनी वाद्य बंद करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर मुख्य मिरवणूक मार्गावर असलेल्या चार ते पाच मंडळांनी वाद्य बंद करुन मिरवणूक काढली. यंदा मिरवणूक मार्गावर फुलांच्या पाकळ्यांची उधळण केली. शहरातील तब्बल 25 हजार घरगुती गणेशोत्सवाचे तापीनदीवरील राहुूलनगर, महादेव व यावल भागातील घाटावर भक्तीभावाने विसर्जन झाले. पोलिस प्रशासनाच्या बंदोबस्ताने केल्याने कोणत्याही प्रकारचे गालबोट न लागता गणेशोत्सव पार पडला.

गारखेडा बॅकवॉटरजवळ गैरसोयी, मार्गावर प्रकाश मंद
शहरातील मुख्य मिरवणूक मार्गावरील नृसिंह मंदिरापासून मुख्य मिरवणूक मार्गावर पालिकेने 18 जनरेटर लावण्याचा दावा केला होता. मात्र मुळात जनरेटरची संख्या कमी असल्याने पुरेसा प्रकाश नव्हता. गेल्या वर्षी पालिकेने गारखेडा येथील वाघुर नदीच्या पुलावर जनरेटर, प्रखर प्रकाशाचे दिवे व क्रेनची व्यवस्था केली होती. यंदा मात्र ही व्यवस्था करण्यात आली नाही. काही मंडळांनी पुढाकार घेवून क्रेन मागवली. मात्र प्रकाशाची सुविधा नसल्याने गणेशभक्तांनी पालिकेच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला.
शिवमुद्राच्या ढोलपथक महिलांचा सक्रिय सहभाग
मिरवणूक मार्गावर शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या गणेशोत्सवात तरुण – तरुणींचे ढोलपथक यंदाच्या मिरवणूकीतही यंदाही लक्षवेधी ठरले. यंदाच्या गणेशोत्सवात महिलांचाही मोठा सहभाग होता. हनुमान नगरातील शिवसैनिक मंडळात महिलांनी गरबा व दांडिया खेळला. जय मातृभुमी प्रतिष्ठान, जय गणेश फाऊंडेशन, शिवमुद्रा प्रतिष्ठान, लेवा प्रतिष्ठान, अष्टभुजा मंडळ, जय लेवा ग्रुप नवरत्न मंडळ, अलंकार मंडळ, चैतन्य मंडळ आदींसह बहूतांश सर्वच मंडळांमध्ये महिलांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
नदीपात्रात जीवनरक्षक तैनात
तापीनदीच्या पात्रातील राहुल नगर, यावल भागाकडील घाटावर प्रशासनाने बॅरिकेट लावले. राहूल नगर घाटावर मुर्तीची पुजा करुन जिवनरक्षकांच्या हाती मुर्ती द्यावी लागत होती. या ठिकाणी पालिकेने 80 पट्टीचे पोहणारे जिवनरक्षक तैनात केले होते. पालिकेने केलेल्या या उपाययोजनेमुळे मात्र कोणतीही दुर्घटना घडली नाही. आपत्कालीन बोट, अग्निमशन दल, प्राथमिक उपचार केंद्र आदींसह सुविधा पालिकेने दिल्या. बॅरीकेटींग व प्रकाश व्यवस्था मात्र पुरेशा प्रमाणात नव्हती.
अंतर्गत भागात अंधाराचे साम्राज्य
राममंदिर वॉर्ड, विठ्ठलमंदिर वॉर्ड, व मिरवणूक मार्गावर बर्याच ठिकाणी मिरवणूकीच्या दरम्यान शॉर्टसर्किटच्या घटना टाळण्यासाठी वीज पुरवठा खंडीत केला होता. या भागात मात्र प्रशासनाने जनरेटर व हॅलोजन दिवे पुरेशा प्रमाणात नसल्याने अंतर्गत रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य होते. यामुळे मुख्य मिरवणूक मार्गावरुन ओसवाल पंचायतीवाड्याकडून येणाजाणार्या महिलांना भिती निर्माण झाली होती. या भागातही पालिकेने हॅलोजन लावणे अपेक्षीत होते.
रात्रीच केली पथकाने स्वच्छता
मिरवणूकीत जामा मशिदीजवळ फुलांच्या पाकळ्या, रंगेबिरंगी कागदांचा ढिग साचला होता. पालिकेच्या स्वच्छता विभागाने रात्री 2 वाजेनंतर जामा मशिद भागातील स्वच्छता केली. तर मिरवणूक मार्गावरील जामनेररोड, अष्टभुजा देवी मंदिर, ब्राह्मण संघ, जवाहर डेअरी भाग या मार्गावरील गुलालही उचलून स्वच्छता करण्यात आली. दरवर्षाप्रमाणे यंदाही जामा मशिद झाकण्यात आली होती.
संस्थांकडून निर्माल्य संकलन
यावलरोडवर माजी नगरसेवक निर्मल कोठारी व साईजिवन गणेश मंडळ, पालिका प्रशासन, श्री संप्रदाय आदींसह शहरातील विविध सामजिक संस्थांनी विविध ठिकाणी निर्माल्य संकलन केले. यामुळे यंदा तापीनदीत निर्माल्य टाकण्याचे प्रमाण अत्यल्प होते. बर्याच भाविकांनी स्वत: निर्माल्य स्वयंसेवकांजवळ देवून नदीत निर्माल्य टाकण्याचा अट्टाहास थांबवला. हा एक चांगला बदल शहरात दिसून आला.
30 हजार भाविकांनी घेतला महाप्रसाद
यावलरोडवर माजी नगरसेवक निर्मल कोठारी यांच्या माध्यमातून यंदाही महाप्रसाद वितरण करण्यात आले. तब्बल 30 हजार भाविकांसाठी साडेतीन हजार किलोची खिचडी, 1200 किलो दह्याची कढी तर 250 कॅरेट केळीचे वितरण करण्यात आले. दुपारी पावणेबारा वाजेपासून रात्री साडेनऊ वाजेपर्यंत अविरतपणे महाप्रसाद वितरण सुरू होते. 30 हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.




