शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचाच आवाज घुमणार !
दसरा मेळावा घेण्यास महापालिकेची परवानगी ; मेळाव्यासाठी घातल्या 25 अटी
Uddhav Thackeray’s voice will echo at Shivaji Park! मुंबई (10 सप्टेंबर 2025) : शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचाच आवाज घुमणार आहे. दसरा मेळावा घेण्यास महापालिकेने परवानगी दिली असून मेळाव्यासाठी मात्र 25 अटी घालण्यात आल्या आहेत.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची ओळख असलेल्या शिवाजी पार्क मैदानावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी महापालिकेकडे अर्ज केला होता. महापालिकेने तो अर्ज स्वीकारून ठाकरे गटाला दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा शिवाजी पार्कवर ठाकरेंचा ‘आवाज’ घुमणार आहे.





दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्याच्या कानाकोपर्यातून शिवसैनिक हे भाषण ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा मेळावा होत असल्याने यातून उद्धव ठाकरे काय भूमिका मांडणार आणि शिवसैनिकांना काय मार्गदर्शन करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेच्या स्थापनेपासून दरवर्षी शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा होतो पण शिवसेनेच्या फुटीनंतर या ठिकाणी मेळावा घेण्यासाठी शिंदे गटानेही परवानगी मागितली होती त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून या मैदानावरील मेळाव्यासाठी दोन्ही गटांमध्ये रस्सीखेच होताना दिसते. यंदा मात्र यावर जास्त काही वाद न होता, हे मैदान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणार आहे. तर शिंदेंचा मेळावा हा आझाद मैदानावर होणार आहे.
