छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान सेवा पंधरवाडा
भुसावळात प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांची माहिती
Service Fortnight from 17th September to 2nd October under Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Mission भुसावळ (12 सप्टेंबर 2025) : शासनाने दिलेल्या निर्देशानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठीची पूर्वतयारी व नियोजनाबाबतची आढावा बैठक उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी दुपारी चार वाजता तापी सभागृह येथे पार पडली. या बैठकीस उपविभागीय पोलिस अधिकारी मुक्ताईनगर, तहसीलदार निता लबडे, बोदवड तहसीलदार अनिल पुरे, मुक्ताईनगर नायब तहसीलदार निकेतन वाळे तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
17 रोजी होणार शुभारंभ
सेवा पंधरवड्याचा शुभारंभ 17 सप्टेंबर रोजी होणार आहे. या दिवशी सर्व शासकीय कार्यालये एका छताखाली येऊन नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती, अर्ज स्वीकृती व तातडीचे कामकाज करण्याच्या सुविधा पुरविणार आहेत.

सेवा पंधरवाड्यात बचत गटांना कर्जवाटप, महा डीबीटी योजनेचे अर्ज, रक्तदान शिबिर,आरोग्य तपासणी,माझी कन्या भाग्यश्री योजना,नवीन मतदार नोंदणी, ई-रेशन कार्ड,महसूल व अतिक्रमण विषयक कामकाज,सामाजिक अर्थसहाय्य योजना,शेती सुलभ योजना,शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबासाठी मदत, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी दाखला शिबिरे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी सर्व नागरिकांनी या सेवा पंधरवाड्यात सहभागी होऊन शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.




