अडावदच्या शेतकर्‍याने नापिकी व कर्जामुळे केली आत्महत्या


Adavad farmer commits suicide due to crop failure and debt अडावद, ता.चोपडा (13 सप्टेंबर 2025)   सातत्याने नापिकी आणि वाढत्या कर्जबाजारीपणामुळे त्रस्त झालेल्या अडासवदच्या शेतकर्‍याने आत्महत्या केली. आबा गोरख महाजन (36, जगदीश नगर, अडावद) असे मृताचे नाव आहे.

शेतकर्‍याने उचलले टोकाचे पाऊल
शेतकरी आबा महाजन यांनी शुक्रवार, 12 सप्टेंबर रोजी सकाळी आपल्या राहत्या घरी विषारी औषधांचे अतिसेवन केले. प्रकृती बिघडल्यानंतर कुटुंबियांनी त्यांना तातडीने चोपडा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केल. मात्र प्रकृती अधिकच गंभीर झाल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे उपचार सुरू असतानाच दुपारी एक वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.


या घटनेची माहिती उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सपना पाटील यांनी चोपडा शहर पोलिसांना दिल्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

कर्जापुढे हात टेकल अन् उचलले टोकाचे पाऊल
आबा महाजन यांच्याकडे वरडी शिवारात चार बिघे शेती होती. यावर्षी त्यांनी मूग, उडीद आणि मका पिकांची लागवड केली होती. परंतु, पावसाचे प्रमाण कमी असल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. मूग आणि उडीदाचे पीक तर पूर्णपणे हातातून गेले. या नुकसानीनंतर त्यांनी कांद्याचे पीक घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी कांद्याचे बियाणे टाकून रोपे तयार केली होती मात्र गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे कांद्याची रोपेही खराब झाली. आधीच भारतीय स्टेट बँकेचे कर्ज होते आणि कांदा लागवडीसाठी त्यांनी हातउसनवारी करून पैसे घेतले होते. हे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, अशी माहिती समोर आली आहे. शेतकर्‍याच्या पश्चात पत्नी, 13 वर्षांचा मुलगा, 10 वर्षांची मुलगी आणि वृद्ध आई-वडील असा परिवार आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !