दाम्पत्याच्या वादात विवाहितेच्या मामांचा खून : वाचा भुसावळातील अयान कॉलनीत नेमके काय घडले ?

गणेश वाघ
Bhusawal murder case: Accused son-in-law remanded in five-day police custody भुसावळ (13 सप्टेंबर 2025) : भुसावळातील विवाहितेला सासरच्यांनी बाहेर काढण्याची धमकी देत छळ सुरू केल्याने वाद मिटवण्यासाठी विवाहितेकडील धुळेस्थित आई-वडील व कंडारीचे मामा भुसावळातील अयान कॉलनीतील जावयाकडे आले व जावयाची समजूत काढताना शाब्दीक वाद गुद्यावर पोहोचला. या वादात विवाहितेच्या मामाची चाकू तसेच डोक्यात फरशी व वीट मारून हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली होती. या घटनेत शेख समद शेख ईस्माईल कुरेशी (40, कंडारी, ता.भुसावळ) यांचा मृत्यू ओढवला तर विवाहितेचे वडीलही जखमी झाले. याप्रकरणी जावई असलेल्या शेख सुभान शेख भिकन (अयान कॉलनी, भुसावळ) यास पोलिसांनी अटक केल्यानंतर शनिवारी न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली

असे आहे भुसावळातील खून प्रकरण
मुस्कानबी शेख सुभान कुरेशी (अयान कॉलनी, भुसावळ) या विवाहितेच्या तक्रारीनुसार, घरात खाण्या-पिण्यासाठी सामान नसल्याने स्वयंपाकासाठी सामान आणून द्या म्हटल्यानंतर पतीसह सासरच्यांनी वाद घातला व विवाहितेला घराबाहेर काढण्याची धमकी दिली. विवाहितेने धुळेस्थित आई-वडीलांना हा प्रकार कळवल्यानंतर विवाहितेचे वडील शेख जमील शेख शकुर कुरेशी, आई शबनुरबी जमील शेख, मामा समद कुरेशी, मामेभाऊ काशीब शेख जाबीर आदी शुक्रवारी दुपारी जावयाला समजावण्यासाठी अयान कॉलनीत आले मात्र यावेळी शाब्दीक वाद गुद्यांवर पोहोचला.
आरोपी जावयाला मामा समद कुरेशी यांनी विवाहितेला का मारहाण केली ? असे विचारल्यानंतर त्याने शिविगाळ करीत गालावर चापट मारली तर विवाहितेच्या आई-वडीलांना शिविगाळ करण्यात आली तसेच विवाहितेला मारहाण करण्यात व आरोपी तीन व चार यांनी विवाहितेच्या वडिलांच्या डोक्यात वीट मारली व आरोपी जाकीर कुरेशी याने घरातील चाकू आणून मामा समद कुरेशी यांच्या छातीत चाकू मारल्याने घाव वर्मी बसला व त्यांचा जागीच मृत्यू ओढवला.
चार आरोपींविरोधात गुन्हा
खून प्रकरणी मुस्कानबी शेख कुरेशी (अयान कॉलनी, भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून आरोपी पती शेख सुभान शेख भिकन कुरेशी, जोहराबी शेख भिकन कुरेशी (दोन्ही रा.अयान कॉलनी, भुसावळ), जाकीर कुरेशी व जाहीर शेख जाकीर कुरेशी (दोन्ही रा.जळगाव) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तपास भुसावळ पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत, भुसावळ बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक निलेश देशमुख करीत आहेत.
