12 हजारांची लाच भोवली : अमळनेरच्या दोन पोलिसांसह खाजगी पानटपरी चालक धुळे एसीबीच्या जाळ्यात


गणेश वाघ
Dhule ACB arrests two policemen from Amalner police station, including a private punter, while taking a bribe of Rs 12,000  भुसावळ (23 सप्टेंबर 2025) : अवैधरित्या गॅस रिफिलिंगचा व्यवसाय करू देण्यासाठी दरमहा 15 हजारांची लाच द्यावी लागेल अन्यथा गुन्हा दाखल करू, अशी धमकी देत तडजोडीअंती 12 हजारांची लाच खाजगी पानटपरी चालकाच्या माध्यमातून स्वीकारताना अमळनेर पोलिस ठाण्याच्या दोन कर्मचार्‍यांना धुळे एसीबीने मंगळवारी रात्री उशिरा अटक केल्यानंतर पोलिस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिस कॉन्स्टेबल अमोल राजेंद्र पाटील (36) व जितेंद्र रमणलाल निकुंभे (33) तसेच पानटपरी चालक उमेश भटू बारी (46, सहारा टॉवर, लोकमान्य शाळेजवळ, अमळनेर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

कारवाईबाबत प्रचंड गोपनीयता
खास सूत्रांच्या माहितीनुसार, तक्रारदार अमळनेरच्या धुळे रोडवरील पाचपावली मंदिराजवळ एका टपरीत एलपीजी गॅस सिलिंडरमधून वाहनांमध्ये गॅस भरण्याचे काम करतात. दोन्ही पोलिस कर्मचार्‍यांनी हा अवैध व्यवसाय करायचा असल्यास दरमहा 15 हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, असे सांगत अन्यथा तुझ्यावर अवैधरित्या वाहनात गॅस भरल्याचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिली.

तक्रारदाराचा इशारा अन आरोपी जाळ्यात
तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर एसीबीचे पथक मंगळवारी दुपारपासून अमळनेरात दाखल झाले. ठरल्याप्रमाणे आरोपींनी लाचेची रक्कम बहादरपूर रोडवरील पाचपावली मंदिरासमोरील मिनाबाई ठाकरे शॉपिंग कॉम्प्लेक्समधील स्वराज्य पान दुकानदार उमेश बारी यांच्याकडे देण्यास सांगितली व बारी यांनी लाच स्वीकारताच तक्रारदाराने पथकाला सांकेतिक इशारा करताच आधी पानटपरी चालकाला व नंतर दोन्ही पोलिस कर्मचार्‍यांना अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
धुळे एसीबीचे डॅशिंग पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक पद्मावती कलाल, पोलिस निरीक्षक यशवंत बोरसे, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, रेश्मा परदेशी, हवालदार सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने यशस्वी केला.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !