विजय तिलक : भारताने नवव्यांदा आशिया कप जिंकला

तिलक वर्माच्या नाबाद 69 धावा तर कुलदीपने घेतल्या चार विकेट


Vijay Tilak: India wins Asia Cup for the ninth time दुबई (29 सप्टेंबर 2025) : तब्बल नवव्यांदा भारताने आशिया कप जिंकला असून देशभरात या विजयानंतर उत्साह व आनंदाचे वातावरण आहे. टीम इंडियाने पाकिस्तानचा पाच विकेट्सने पराभव केला.
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तान संघ 19.1 षटकात 146 धावांवर सर्वबाद झाला.

भारताचा विजयी ‘तिलक’
कुलदीप यादवने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. पाकिस्तानकडून साहिबजादा फरहानने सर्वाधिक 57 धावा केल्या.
रविवारी, भारतीय संघाने 20 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर 147 धावांचे लक्ष्य गाठले. रिंकू सिंगने चौकार मारून भारताला विजय मिळवून दिला. तिलक वर्मा 69 धावा करून नाबाद राहिला.

खेळाडूंना बक्षीस जाहीर
भारताची आशिया कप जिंकण्याची नववी वेळ ठरली. टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात आशिया चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला. टीम इंडियाच्या या ऐतिहासिक कामिगिरीनंतर बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयने भारतासाठी बक्षिस रक्कम जाहीर केली आहे. बीसीसीआयने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती दिली आहे.

बीसीसीआयने पेटारा उघडला
बीसीसीआयने आशिया कप विजेत्या भारतीय संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी बक्षिस रक्कम जाहीर केली आहे. बीसीसीआयने 21 कोटी रुपये बक्षीस म्हणून देणार असल्याचे जाहीर केले. बीसीसीआयने आशिया कप स्पर्धेसाठी मुख्य संघात 15 खेळाडूंना स्थान दिलं होतं तर टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमध्ये मुख्य प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक, बॉलिंग-बॅटिंग आणि फिल्डिंग कोच असे एकूण 5 सदस्य आहेत. अशाप्रकारे टीम इंडियाचे 15 खेळाडू आणि 5 सपोर्ट स्टाफमधील सदस्य असे मिळून हा आकडा 20 होतो त्यामुळे प्रत्येकाला एक कोटी रुपये मिळतील, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. तसेच ही रक्कम कमी जास्त होऊ शकते मात्र बीसीसीआयच्या या निर्णयामुळे खेळाडू आणखी मालामाल होतील इतकं मात्र निश्चित आहे.

भारताने सामना असा जिंकला
पाकिस्तानसाठी साहिब जादा फरहाने याने सर्वाधिक 57 धावा केल्या. तर फखर झमान याने 46 धावांचं योगदान दिलं. सॅम अयुबने 14 धावा जोडल्या. तर टीम इंडियाने इतरांना झटपट गुंडाळलं. टीम इंडियाने पाकिस्तानचं अशाप्रकारे 19.1 ओव्हरमध्ये 146 रन्सवर पॅकअप केलं.

टीम इंडियाची 147 धावांच्या प्रत्युत्तरात निराशाजनक सुरुवात राहिली. भारताने 20 धावांवर 3 विकेट्स गमावल्या मात्र त्यानंतर तिलक वर्मा, संजू सॅमसन आणि शिवम दुबे या त्रिकुटाने निर्णायक खेळी करत भारताला विजयी केलं. तिलकने संजूसह चौथ्या आणि शिवमसह पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत भारताला विजयी केलं. संजूने 24 आणि शिवमने 33 धावा केल्या. तर तिलक वर्मा विजयी करुन नाबाद राहिला. तिलकने नाबाद 69 धावांची खेळी केली. भारताने 2 बॉलआधी 5 विकेट्स गमावून हा सामना जिंकला आणि सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकण्याचा आपला विक्रम आणखी भक्कम केला.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !