‘खरं सांग पोरी आमचं कुठं चुकलं’ कवितेने डोळ्यात आणल पाणी
पुष्पांजली प्रबोधनमालेत चिनावल विद्यालयात कवी प्रमोद अंबडकरांचे मार्गदर्शन
चिनावल : सुख, दु:खाचे प्रसंग कमी शब्दात मांडण्याचं सामर्थ्य कवितेत सामावलेलं आहे, असे मत नाशिकचे ‘चँडमँड’फेम कवी प्रमोद अंबडकर यांनी चिनावल येथील नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील व्याख्यानात व्यक्त केले. त्यांनी सादर केलेल्या ‘खरं सांग पोरी आमचं कुठं चुकलं’ या कवितेने विद्यार्थी रसिकांच्या डोळ्यात पाणी आणलं. भुसावळच्या अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मरणार्थ पुष्पांजली फिरत्या व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प शुक्रवारी गुंफण्यात आले. त्यात ‘चाल दोस्ता तुला आपला गाव दाखवतो’ हा विषय कवितेतून मांडताना ते बोलत होते.
जाणिवा पेरणार्या कवितांना दाद
प्रबोधनमालेचे प्रथम पुष्प गुंफताना कवी अंबडकर यांनी सामाजिक जाणिवा पेरणार्या कविता सादर करून विद्यार्थी रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला. ‘जावू नको दूर जीव जिवाले टांगून, मनावर नाव तुह्य घेतलं गोंदून’ या कवितेतून त्यांनी वातावरण निर्मिती केली. ‘वावरात शेतकर्याची सत्ता नाही, विहिरीत पाण्याचा पत्ता नाही’ या कवितेतून दुष्काळ आणि सावकारी कर्जाने पिचलेल्या शेतकरी बापाच्या वेदना मांडल्या. ‘पाच वर्षापासून कनेक्शनसाठी केलेला अर्ज दाखवतो, चाल दोस्ता तुला विदर्भ दाखवतो’ या कवितेतून शेतकर्यांना नाडणार्या नोकरशाहीवर प्रहार केला.
कवितेतून मांडली कष्टकरी बापाची महती
‘खरं सांग पोरी आमचं कुठं चुकलं, अन् देलं संस्काराचं गणित कुठं हुकलं’ या कवितेतून अंबडकर यांनी वयात आलेली मुलगी घर सोडून निघून गेल्यावर कष्टकरी बापाची काय अवस्था होते हे भावनात्मकरितीने मांडले. ही वास्तववादी कविता ऐकताना विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षिकांचे डोळे पाणावले. ‘महापुरुषांवर कविता लिहीली लोकांनी मला फोन करून जात विचारली. मी माणसावर कविता लिहीली मला फोनच आला नाही’ ही गद्यशैलीतील कविताही त्यांनी सादर केली. या कवितेतून त्यांनी फोफावलेल्या जातीयवादावर कोरडे ओढून उपस्थितांना अंतर्मुख केले.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
चिनावल शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन किशोर बोरोले अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परीषदेचे उपाध्यक्ष तथा आमदार हरीभाऊ जावळे, रावेर पंचायत समितीच्या सभापती माधुरी नेमाडे, चिनावलच्या सरपंच भावना बोरोले, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष किरण नेमाडे, उपाध्यक्ष खेमचंद्र पाटील, सचिव गोपाळ पाटील यांची उपस्थिती लाभली. सूत्रसंचालन शिक्षिका लिना कोल्हे, छाया सावकारे यांनी केले. त्यांना एच.आर.ठाकरे, एम.एस.महाजन, एन.एन.महाजन, जी.बी.निळे यांनी सहकार्य केले. आभार प्राचार्या शारदा बैरागी यांनी मानले. प्रकल्प प्रमुख संजय भटकर, समन्वयक ज्ञानेश्वर घुले, संयोजक प्रा.डॉ.जतीन मेढे, अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील, सागर भारंबे, प्रभाकर नेहेते, रजिंदर थिंड, मंगेश भावे यांनी यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले. अंतर्नादने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी सुरू केलेली ही प्रबोधनमाला पथदर्शी ठरेल. विद्यार्थ्यांची पावले शाळांमधील ग्रंथालयांकडे वळण्यास मदत होईल, असा विश्वास आमदार हरीभाऊ जावळे यांनी उद्घाटनसत्रात व्यक्त केला.