नाशिककरांना मोठा दिलासा : आता दिवसातून दोन वेळा दिल्लीसाठी विमानसेवा

Big relief for Nashik residents : Now there are flights to Delhi twice a day नाशिक (6 ऑक्टोबर 2025) : नाशिक जिल्ह्यातील उद्योजक व प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आता नाशिकहून दिल्लीसाठी दररोज दोन वेळा विमानसेवा असणार आहे.
नियमित विमान सेवेने मिळणार दिलासा
नवी दिल्ली विमानतळावरील रनवे (10/28) या धावपट्टीचे काम 15 जूनपासून सुरू करण्यात आल्याने नाशिक-नवी दिल्ली विमानसेवा रोजऐवजी आठवड्यातून तीनच दिवस इतकी कमी करण्यात आली होती. यामुळे नाशिकहून दिल्लीला जाणारे पर्यटक, नियमितपणे ये-जा करणारे व्यावसायिक यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. या अनुषंगाने राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किनेझारापू राममोहन नायडू यांना 12 जुलै 2025 रोजी पत्र लिहून नाशिक-दिल्ली विमान सेवा पुन्हा पूर्वीप्रमाणे सुरू करण्याची मागणी केली होती.
आता नवी दिल्ली विमानतळावरील धावपट्टीचे काम पूर्ण झाल्याने इंडिगो विमान कंपनीकडून 26 ऑक्टोबरपासून दिल्लीसाठी दररोज दोन वेळा विमानसेवा सुरु करण्याची घोषणा करण्यात आली आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे. यामुळे नाशिक ते दिल्ली असा विमानप्रवास करणार्या प्रवाशांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे.
180 आसनांचे विमान
180 आसनांचे हे विमान असेल, उद्योजक आणि व्यावसायीकांसाठी प्रामुख्याने या विमानसेवेचा लाभ होणार आहे. एका दिवसात दिल्लीतील कामे उरकून नाशिकमध्ये परत येणे व्यापारी, व्यावसायिक यांना शक्य होणार आहे. तसेच नाशिकमध्ये विविध पर्यटन कंपन्या कार्यरत आहेत. उत्तर भारतातील पर्यटनस्थळी जाण्यासाठी पर्यटन कंपन्यांना नाशिकहून थेट दिल्ली विमानसेवा फायदेशीर पडणार आहे.
