80 हजारांची लाच घेताच जळगावात रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीकडून बेड्या

गणेश वाघ
ACB arrests three people including Ringangaon Sarpanch in Jalgaon after accepting a bribe of Rs 80000 भुसावळ (7 ऑक्टोबर 2025) : जळगावातील शासकीय कंत्राटदाराला हस्तांतर करारनामा करून देण्याच्या मागणीसाठी 80 हजारांची लाच एरंडोल तालुक्यातील रिंगणगावच्या सरपंचाने मागितली होती. जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर मंगळवारी सायंकाळी जळगावच्या काव्य रत्नांजली चौकात सापळा रचण्यात आला व खाजगी पंटराच्या माध्यमातून लाच स्वीकारताच तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या.
सरपंचासह सदस्यपती जाळ्यात
अटकेतील आरोपींमध्ये रिंगणगाव सरपंच भानुदास पुंडलिक मते (खोंडेवाडा, ता.एरंडोल), सदस्यपती समाधान काशीनाथ महाजन (38, युनियन बँकेजवळ, एरंडोल) व संतोष नथ्थू पाटील (49, कल्याणेहोळ, ता.धरणगाव) यांचा समावेश आहे. या कारवाईने रिंगणगाव ग्रामपंचायतीतील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार हे शासकीय कंत्राटदार आहेत. त्यांनी जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेत एक कोटी 50 लाख 23 हजार 321 रुपयांचे काम केले आहे व एक कोटी 27 लाख 23 हजार 321 रुपयांचे बिल प्राप्त झाले आहे तर उर्वरीत 23 लाख रुपये प्रलंबित असल्याने त्यांनी जिल्हा परिषदेकडे प्रकरण सादर केले आहे. जलजीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेले काम ताब्यात घेण्यासाठी सरपंच यांचा करारनामा अपूर्ण असल्याने देयक प्रलंबित होते.
सरपंच भानुदास मते व सदस्य पती भानुदास महाजन यांची 6 ऑक्टोबर रोजी भेट घेतल्यानंतर त्यांनी हस्तांतरनामा देण्यासाठी एक लाखांची लाच मागिली व 80 हजार रुपये स्वीकारण्यावर तडजोड केली. 7 रोजी जळगाव एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर मंगळवारी सायंकाळी काव्य रत्नांजली चौकात सापळा रचण्यात आला. खाजगी पंटर संतोष नथ्थू पाटील याच्याकडे लाचेची रक्कम देण्याचा इशारा केल्यानंतर सुरूवातीला खाजगी पंटर व नंतर सरपंच व सदस्य पतीला एसीबीकडे बेड्या ठोकल्या.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक योेगेश ठाकूर, पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे, ग्रेडेडे पीएसआय सुरेश पाटील, नाईक बाळू मराठे, कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी आदींच्या पथकाने यशस्वी केला.
