मनसेचा पाठपुरावा अन् बोदवडच्या करण गंगतीरेचे हॉटेल व्यावसायीक होण्याचे स्वप्न झाले पूर्ण


बोदवड (10 ऑक्टोबर 2025) : इच्छेला प्रयत्न व पाठपुराव्याची जोड लाभल्यास मार्ग सुकर होतो. याचा प्रत्यय बोदवडच्या करण गंगतीरे यांना आला. हॉटेल व्यावसायीक होण्याचे त्यांनी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण झाले आहे. अर्थात यासाठी मनसेचा पाठपुरावा मनसे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.जमील देशपांडे यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांना मुख्यमंत्री अर्थ सहाय्य योजनेतून 10 लाखांपर्यंत कर्जाची मंजुरी मिळाली आहे.

कार्यकर्ते उद्योजक होण्याच्या मार्गावर
मनसे कार्यकर्ते आता आंदोलनासोबतच उद्योजकतेच्या मार्गावर आहेत. मराठी तरुणांनी प्रेरणा घ्यावी, स्वप्न पहावे, प्रयत्न करा आणि मनसेसोबत उभे रहावे या राज ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कार्यकर्त्यांनी वाटचाल सुरू केली आहे.

बोदवड येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सहकारी करण गंगतीरे याला मुख्यमंत्री अर्थ सहाय्य योजनेंतर्गत जिल्हा उद्योग केंद्रामार्फत हॉटेल (ढाबा) व्यवसायाकरिता 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेण्याचे पत्र शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव शहर उपशहराध्यक्ष ललित शर्मा यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले.

मनसे कार्यकर्ते स्वावलंबनाच्या दिशेने पावले टाकत असताना, त्यांना आवश्यक ती प्रशासकीय मदत, कागदपत्रांची पूर्तता आणि बँकांशी समन्वय साधण्याची जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वीकारली आहे. या अनुषंगाने जिल्हा उद्योग केंद्रात कागदपत्रांची पूर्तता व कर्ज देणार्‍या बँकांसोबतचा आवश्यक पाठपुरावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.जमील देशपांडे स्वतः करणार आहेत. प्रसंगी श्रीकृष्ण मेंगडे, दीपक राठोड आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

मनसेच्या या उपक्रमातून मराठी तरुणांना रोजगाराच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची प्रेरणा मिळत आहे. करण गंगतीरे यांच्या नव्या हॉटेल व्यवसायासाठी मनसे परिवाराने शुभेच्छा दिल्या आहेत. हॉटेलचा शुभारंभ झाल्यावर मस्त शेव-भाजीचा ताव मारण्यासाठी मनसे टीम लवकरच बोदवडला पोहोचेल, अशी विनोदी शैलीत शुभेच्छा देत अ‍ॅड.जमील देशपांडे यांनी मराठी उद्योजकांना पुढे येण्याचे आवाहन केले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !