भाजपाशी बंडखोरी केल्यास पक्षात परतीचा प्रवास बंद : मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मोबाईलसह व्हॉटसअॅप सर्व्हिलन्सवर असल्याचा दावा
If you rebel against BJP, your return to the party will be blocked: Minister Chandrashekhar Bawankule भंडारा (24 ऑक्टोबर 2025) : पक्षांतर्गत बंडखोरी केल्यास गंभीर परिणाम होतील व भंडार्यातील सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअॅप ग्रुप सर्व्हिलन्सवर टाकल्याचे खळबळजनक विधान राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी भंडारा येथे आयोजित कार्यकर्ता दिवाळी स्नेहमेळाव्यात केल्याने खळबळ उडाली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांना अत्यंत कडक शब्दात त्यांनी दिलेल्या इशार्याची राज्यात चर्चा आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पक्षात कुणी बंडखोरी केल्यास किंवा एक चुकीचं बटन दाबल्यास त्याचा मोठा फटका पक्षाला बसेल. एक चुकीचे बटण दाबल्यास देवेंद्र फडणवीस सरकार आणि केंद्र सरकारच्या योजनांचा बट्ट्याबोळ होईल त्यामुळे चुकीचे बटन दाबून भंडार्याचा सत्यानाश करू नका. तिकीट न मिळाल्याच्या रागात खडा तमाशा उभा करू नका, असा सल्लाही त्यांनी नेत्यांना दिला.

बंडखोरी करणार्यांना थेट इशारा देताना बावनकुळे म्हणाले, जर कुणी बंडखोरी केलीच, तर पक्षाच्या मोठ्या नेत्यांचे दरवाजे त्या कार्यकर्त्यांसाठी पाच वर्षांसाठी बंद होतील, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. तसेच आता भंडार्यातील सर्व मोबाईल आणि व्हॉट्सप ग्रुप सर्व्हेलन्सवर टाकले असून, सर्वांवर बारीक करडी नजर राहणार आहे, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना शिस्त पाळण्याचे निर्देश दिले.
बावनकुळे यांनी यावेळी भंडारा, पवनी, तुमसर आणि साकोली या चारही नगरपालिकांच्या जागा भाजपने लढवाव्यात, यासाठी कार्यकर्त्यांना ‘51 टक्क्यांची लढाई’ लढण्याचे आवाहन केले. या निवडणुकीसाठी लागेल तेवढा पैसा देण्यास तयार असून विधान सभेपेक्षा जास्त ताकद या नगरपालिका निवडणुकीत लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा कार्यक्रम भंडारा भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. भंडार्याचे पालकमंत्री पंकज भोयार, माजी राज्यमंत्री व आमदार परिणय फुके, माजी आमदार सुधाकर कोहळे हे यावेळी उपस्थित होते.

