दिवाळी शुभेच्छांची पोस्ट ठरली अखेरची : चारित्र्याच्या संशयातून पत्नीने पतीचा आवळला गळा
Diwali greetings post turned out to be the last : Wife strangles husband over suspicion of character पिंपरी (24 ऑक्टोबर 2025) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याच्या वादातून दाम्पत्यात झालेल्या टोकाच्या वादानंतर पत्नीने पतीचा गळा आवळून आवळून खून केला. चिंचवड पोलिस ठाणे हद्दीतील माणिक कॉलनी, लिंक रोड परिसरात शुक्रवारी खुनाची घटना समोर आली. नकुल आनंद भोईर (40, रा.भोईर कॉलनी, चिंचवड) असे खून झालेल्या सामाजिक कार्यकर्त्याचे नाव आहे. खून प्रकरणी त्यांची पत्नी चैताली नकुल भोईर (28, रा.माणिक कॉलनी, चिंचवड) हिला पोलिसांनी अटक केली.
दरम्यान, मयत नकुल हे महापालिकेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर पत्नी चैताली भोईर यांना निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्नशील होते व सोशल मिडीयावर त्यांनी टाकलेली दिवाळीची पोस्टदेखील अखेरची ठरली आहे.




काय घडले नेमके ?
दाम्पत्यात काही दिवसांपासून वाद सुरु होते. मयत नकुल भोईर हे पत्नी चैतालीवर चारित्र्याचा संशय घेत होते व त्यातूनच शुक्रवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास चैताली हिने रागाच्या भरात नकुल भोईर यांचा कापडाने गळा आवळून खून केला, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
मयत नकुल भोईर हे मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड या संघटनांमध्ये पदाधिकारी म्हणून कार्यरत होते व सामाजिक कार्यकर्ते आणि सर्पमित्र म्हणून परिचित होते. नकुल भोईर आणि चैताली भोईर हे दोघेही आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक होते. त्यांच्या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.