फौजदाराने बलात्कार केल्याचे म्हणत महिला डॉक्टरांची आत्महत्या : पोलिसांकडून अधिकार्याचे तत्काळ निलंबन
Female doctor commits suicide after claiming to have been raped by a police officer : Police immediately suspend officer फलटण (24 ऑक्टोबर 2025) : पोलिस अधिकार्याने चार वेळा बलात्कार केल्याचे म्हणत महिला डॉक्टराने आत्महत्या केल्याचे घटना सातार्यातील फलटण येथे घडली. या प्रकारानंतर पोलिस प्रशासनाने तत्काळ गुन्हा दाखल करीत फौजदार गोपाल बदने यास निलंबित केले आहे. डॉक्टरांच्या आत्महत्येनंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असून मुख्यमंत्र्यांनी तातडने या प्रकरणात कारवाईचे निर्देश यंत्रणेने दिले आहेत.
असे आहे प्रकरण
सातार्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरांनी आत्महत्या केली व तत्पूर्वी हातावरच त्यांनी आत्महत्येचे कारण लिहिले. त्यात कर्मचार्यासह एका पोलिस अधिकार्यावर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप करण्यात आले. फौजार गोपाल बदने याने माझ्यावर चार वेळा बलात्कार केला तर पोलिस प्रशांत बनकर याने मला सतत मानसिक त्रास दिल्याचे महिला डॉक्टरांनी आपल्या हातावर लिहिले आहे. या धक्कादायक खुलाशानंतर पोलिस यंत्रणा आणि आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.




वाद आणि चौकशीचा दबाव
महिला डॉक्टर या गेल्या काही महिन्यांपासून पोलिस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या. वैद्यकीय तपासणीसंदर्भात पोलिसांशी त्यांचा वाद झाल्यानंतर त्यांच्यावर अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली होती. या चौकशीदरम्यान त्यांनी आपल्या वरिष्ठांना लेखी स्वरूपात तक्रार देत म्हटले होते की, माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन. तथापि, त्यांच्या या तक्रारीकडे वरिष्ठांकडून कोणतीही ठोस दखल घेण्यात आली नाही, असा आरोप त्यांच्या सहकार्यांकडून केला जात आहे.
महिला डॉक्टरचे टोकाचे पाऊल
अखेर काल (गुरुवारी) रात्री महिला डॉक्टरने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. त्यांच्या हातावर आढळलेल्या लिखाणामुळे आत्महत्येचे प्रकरण आता गुन्हेगारी चौकशीच्या टप्प्यावर गेले आहे.
‘त्या’ फौजदाराचे तत्काळ निलंबन
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून घेतली. त्यांनी संबंधित पोलीस अधिकार्याला तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याचेही निर्देश देण्यात आले आहे. यानंतर पोलिसांकडून गोपाळ बदनेचे तत्काळ निलंबन करण्यात आले.
याबाबत सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी म्हणाले की, आम्ही या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. एका आरोपीचे नाव पीएसआय गोपाल बदने आहे. तो फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचा आहे. दुसरा आरोपी प्रशांत बनकर आहे. तो पोलिस नसून सामान्य नागरिक आहे. या प्रकरणात आम्ही गोपाल बदनेला निलंबित करत आहोत. या दोघांना अटक करण्यासाठी पोलिस पथक रवाना करण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. आरोपींना तात्काळ अटक करायची आणि जी काही कारवाई आहे ती करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यानुसार आम्ही तपास करत आहोत.