भुसावळात हद्दपारीचे आठ प्रस्ताव पोलिसांकडून एसपी कार्यालयाकडे सादर : पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत
निवडणूक काळात उपद्रवी राहणार शहराबाहेर !
Eight proposals for deportation in Bhusawal submitted by the police to the SP’s office : Deputy Superintendent of Police Sandeep Gavit भुसावळ (13 नोव्हेंबर 2025) : भुसावळ शहरात पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी बाजारपेठ आणि शहर पोलिसांनी तब्बल आठ हद्दपारीचे प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे पाठवल्याची माहिती डीवायएसपी संदीप गावीत यांनी दिली.
उपद्रवींर होणार कारवाई
या प्रस्तावांमध्ये वारंवार गुन्हे करणारे, दहशत निर्माण करणारे आणि निवडणुकीच्या काळात असामाजिक हालचालींमुळे वातावरण बिघडविण्याची शक्यता असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. पोलिसांनी संबंधितांच्या गुन्हेगारी नोंदींचा अभ्यास करून हे प्रस्ताव तयार केले असून मंजुरीसाठी एसपी कार्यालयाकडे सादर करण्यात आले आहेत.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात शांती, सुरक्षा आणि लोकशाही प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी पोलिसांनी व्यापक नियोजन केले आहे. संशयितांवर सतत गस्त वाढविण्यात आली असून, हद्दपारी व्यतिरिक्त फरार, हिस्त्रीशीटर व मोक्का आरोपींवरही देखरेख ठेवली जात आहे. पोलिस ठाण्यांमार्फत शहरातील संवेदनशील भागांत नाकाबंदी, गस्त आणि तपासणी मोहिम राबविली जाणार आहे.तसेच मतदानाच्या काळात कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार किंवा गोंधळ होऊ नये म्हणून विशेष पथके तैनात करण्याचे नियोजन सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. भुसावळ पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, निवडणूक काळात कायदा मोडणार्यांवर कठोर कारवाई होणार आहे.


