धरणगाव पोलिसांची कामगिरी : जबरी लूट करणारी चौकडी जाळ्यात


Dharangaon Police’s performance: Robbery quartet caught धरणगाव (13 नोव्हेंबर 2025) : बांधकाम कंपनीच्या सुपरवायझरला मारहाण करून 30 हजारांची लूट करणार्‍या चौकडीलास धरणगाव पोलिसांनी अवघ्या चार तासांत अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली कार आणि लुटलेली बहुतांश रोकड जप्त केली.

काय आहे नेमके प्रकरण ?
धनंजय शंकर पाटील (रा.खोडांमळी, नंदुरबार) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते बुधवारी 12 नोव्हेंबर रोजी रात्री खामगाव येथील काम संपवून ठेकेदार आणि कामगारांसह त्यांच्या इसुझु कॅम्पर गाडीतून जात होते. मुसळी फाट्याजवळील हॉटेल अर्जुना येथे जेवण करून पुढे जात असताना बुधवारी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास मुसळी गावाजवळ पांढर्‍या रंगाच्या ह्युंडाई कारमधून (क्र.एम.एच.14 एल.एक्स8515) वरून चार अज्ञात इसमांनी त्यांची गाडी आडवी लावली.

चार तासात चौकडी जाळ्यात
या हल्लेखोरांनी पाटील आणि त्यांच्या सहकार्‍यांना मारहाण करून ठेकेदार शंकर बामनी यांच्या खिशातून 30 हजारांची रोकड जबरदस्तीने काढून पळ काढला. गुन्ह्यानंतर पोलिस निरीक्षक सुनील पवार यांनी सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कंडारे व त्यांच्या पथकासह तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. तक्रारदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुप्त माहिती काढून सुनील अशोक कुर्‍हाडे (21), विजय मेवालाल मोहिते (25) यांना ताब्यात घेतले. या दोघांच्या चौकशीतून गणेश लक्ष्मण अहिरे (21), कृष्णा अशोक राठोड (21) यांची नावे समोर आल्यानंतर त्यांना पहाटे 5.30 वाजता अटक करण्यात आली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार आणि लुटलेले 29 हजार 700 रुपये जप्त करण्यात आले आहेत. या आरोपींविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल आहे. तपास पाळधी दूरक्षेत्राचे सहा.पोलिस निरीक्षक प्रशांत कंडारे करीत आहेत.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !