भुसावळ पालिका निवडणुकीत रजनीताई सावकारे भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार !

सेना-भाजपाच्या युतीतील चर्चेनंतर शुक्रवारी महिला समर्थकांसह अर्ज केला दाखल


गणेश वाघ
Rajnitai Savkare is BJP’s candidate for the post of Mayor in the Bhusawal Municipal Election! भुसावळ (14 नोव्हेंबर 2025) : भुसावळ नगरपालिका निवडणुकीचा आखाडा तापला असतानाच शुक्रवार, 14 रोजी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या सौभाग्यवती सौ.रजनी संजय सावकारे यांनी महिला समर्थकांसह भाजपातर्फे नगराध्यक्ष पदासाठी उमदेवारी अर्ज दाखल केला. रजनीताई याच पक्षाच्या अधिकृत उमेदवार असतील हे निश्चित आहे तर दुसरीकडे प्रमुख लढत असलेल्या महाविकास आघाडीने सहा उमेदवारांची नावे जाहीर केली असलीतरी नेमकी उमेदवारी कुणाला मिळणार? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

14 वर्षांपासून भुसावळच्या पटलावर निर्माण केला स्व-कर्तृत्वाचा ठसा
भुसावळातील सौ.रजनी संजय सावकारे या गेल्या 14 वर्षांपेक्षा अधिक काळापासून भुसावळच्या पटलावर सामाजिक कार्य करीत आहेत. मंत्री संजय सावकारे यांच्या सुविद्य पत्नी तर त्या आहेतच मात्र केवळ लोकप्रतिनिधींच्या सौभाग्यवती म्हणून त्यांनी नावलौकीक मिळवला नाही तर सामाजिक, राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याने वेगळा ठसा उमटवत स्त्री शक्ती स्वावलंबी होण्यासाठी पाऊल उचलत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.




भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा असलेल्या सौ.रजनी सावकारे या महिलांसाठी गेल्या 14 वर्षांपासून महिलांना विविध व्यवसाय व उद्योग वाढीसंदर्भात प्रशिक्षण देवून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी स्वावलंबी करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या घोषणेला प्रतिसाद देत त्यांनी स्वदेशी वस्तूंचा वापर होण्यासाठी चळवळ सुरू करीत शहर व तालुक्यातील छोट्या स्थानिक व्यावसायीकांना स्थानिक स्तरावर मेळाव्याच्या माध्यमातून रोजगार मिळवून दिला असून शेकडो महिला आता त्यांच्या पायावर स्वकर्तृत्वाने उभ्या राहून संसाराला हातभार लावत आहेत.

सौ.रजनी सावकारे यांनी इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ व जेसीआय ताप्ती क्लबमध्ये काम करताना विविध उपक्रम राबवून आदर्श निर्माण केला आहे तसेच प्रतिष्ठा मंडळाच्या माध्यमातून आयोजित मेळाव्यातून त्यांनी स्वयंरोजगारही महिलांना उपलब्ध करून दिला आहे.

भाजपा-शिंदे सेनेची युती अन् नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल
भुसावळात स्वबळावर लढणार असल्याची वल्गना आधी शिंदे सेनेने केली मात्र जागांवर वाटाघाटी होताच मंत्री संजय सावकारे व मंत्री गुलाबराव पाटील यांनी युती करण्याबाबत होकार दिला व जळगावातील बैठकीत नगराध्यक्षपद भाजपाकडे जाणार असल्याचे निश्चित झाले. त्यानंतर सौ.रजनीताई सावकारे यांनी समर्थकांसह शुक्रवार, 14 रोजी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी डॉ.संगीता बियाणी, डॉ.मृणाल पाटील, माजी नगरसेविका मीना लोणारी, माजी नगरसेविका प्रीतमा गिरीश महाजन, सोनल महाजन, प्रीती कोलते, मंगला पाटील, प्रीती मुकेश पाटील आदींची उपस्थिती होती.

उद्यापासून पेटणार राजकीय आखाडा
भुसावळातील निवडणूक महायुती व महाविकास आघाडीसोबत रंगणार असून अन्य पक्ष तसेच अपक्षही या निवडणुकीत ताकद पणाला लावणार आहेत. दोन्ही प्रमुख पक्षांनी अद्याप उमेदवार जाहीर केले नव्हते मात्र भाजपाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर एक-दिवसात महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर होईल तसेच नगरसेवक पदांची नावे निश्चित झाल्यानंतर राजकीय आखाडा तापण्यास सुरूवात होणार आहे. या निवडणुकीत मंत्री संजय सावकारे, माजी मंत्री एकनाथराव खडसे व माजी आमदार संतोष चौधरी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सत्तेच्या सारीपाटात कोण बाजी मारणार? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !