एमआयडीसी पोलिसांची कामगिरी : अट्टल चोरट्यांची टोळी जाळ्यात
जळगाव (19 नोव्हेंबर 2025) : जळगावच्या एमआयडीसी पोलिसांनी लक्ष्मी नगर भागात बंद घरांमध्ये घरफोडी करून संसारोपयोगी वस्तू चोरणार्या टोळीला बेड्या ठोकत 52 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
लक्ष्मी नगर येथील रहिवासी राजेंद्र दुसाने यांचे घर गेल्या दोन महिन्यांपासून बंद होते. 12 नोव्हेंबर रोजी घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरट्यांनी त्यांच्या घरातून एलईडी टीव्ही, फ्रीज, कुलर, गॅस शेगडी तसेच तांबे-पितळीच्या मौल्यवान भांड्यांसह इतर संसारोपयोगी वस्तू लंपास केल्या होत्या.

एमआयडीसी पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पोलिस उपनिरीक्षक राहुल तायडे आणि चंद्रकांत धनके यांच्यासह अनुभवी कर्मचार्यांचे एक विशेष पथक नेमले. गोपनीय माहितीच्या आधारे या पथकाने लक्ष्मी नगर परिसरात सापळा रचला आणि मुख्य आरोपी संदीप तुळशीराम शेवरे याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, संदीप शेवरे याने आपला साथीदार राहुल सुपडू चौधरी आणि एका अल्पवयीन मुलासह मिळून ही घरफोडी केल्याची कबुली दिली.
रिक्षासह मुद्देमाल जप्त
पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींकडून चोरीस गेलेला 52 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. गुन्ह्यात सहभागी असलेल्या राहुल चौधरी यालाही अटक करण्यात आली. चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेली रिक्षा देखील पोलिसांनी जप्त केली.


