भुसावळ पालिका निवडणूक : नगराध्यक्ष पदासाठी आठ तर नगरसेवक पदासाठी 247 उमेदवार रिंगणात
अखेरच्या दिवशी भाजपाचे पिंटू कोठारी व महिमा नागराणी बिनविरोध ; नगराध्यक्ष पदासाठी दोघांची तर नगरसेवक पदासाठी 78 उमेदवारांची माघार
गणेश वाघ
Bhusawal Municipality Election : Eight candidates in fray for Mayor post and 247 for Corporator post भुसावळ (21 नोव्हेंबर 2025) : उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक चुरशीची निवडणूक होणार्या भुसावळ पालिकेच्या निवडणुकीत अखेरच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी दोघांनी तर नगरसेवक पदासाठी 78 उमेदवारांनी माघार घेतली. माघारीनंतर रिंगणातील चित्र स्पष्ट झाले आहे. आता नगराध्यक्ष पदासाठी आठ तर नगरसेवक पदाच्या 47 जागांसाठी 247 उमेदवार रिंगणात असतील. अत्यंत चुरशीचा सामना येथे पहायला मिळणार असून शनिवारपासून आता प्रचाराचा धुराळा उडणार आहे. भाजपाचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातर्फे माजी मंत्री एकनाथराव खडसे व माजी आमदार संतोष चौधरी यांची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
अखेरच्या दिवशी यांची माघार
नगराध्यक्ष पदासाठी दहा नामांकन दाखल होते व त्यापैकी शुक्रवारी स्वाती श्रीकांत बाविस्कर व रुपाली अमोल चौधरी यांनी माघार घेतल्याने आता निवडणूक रिंगणात आठ उमेदवार असतील तर नगरसेवक पदाच्या 50 जागांसाठी 339 उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते मात्र अखेरच्या दिवशी 78 तर आजअखेर 92 उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक रिंगणात 247 उमेदवार असतील. भाजपाच्या तीन जागा बिनविरोध निवडून आल्या असून 47 जागांसाठी आता 247 उमेदवारांमध्ये लढत होईल.


भुसावळात भाजपाच्या दोन जागा बिनविरोध
भाजपाच्या दोन उमेदवारांविरोधात उभ्या असलेल्या उमेदवारांनी माघार घेतल्याने भाजपाच्या दोन जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक 21 ब मधून साईसेवक पिंटू उर्फ निर्मल कोठारी तसेच प्रभाग 23 अ मधून महिमा अजय नागराणी बिनविरोध निवडून आल्या आहेत. भुसावळातील साईसेवक पिंटू कोठारी प्रभाग क्रमांक 21 ब मधून भाजपाचे उमेदवार होते मात्र प्रतिस्पर्धी उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार आऊँ चौधरी यांनी अखेरच्या दिवशी शुक्रवारी माघारी घेतल्याने व या प्रभागातून केवळ दोनच उमेदवार शिल्लक राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
भुसावळातील क्रमांक 23 अ मधून महिमा अजय नागराणी या भाजपातर्फे उमेदवार होत्या तर त्यांच्याविरोधात पुष्पा कैलास चौधरी उभ्या होत्या. माघारीच्या दिवशी त्यांनी माघार घेतल्याने महिमा अजय नागराणी यांचीही बिनविरोध निवड झाली.
भाजपाने तीन जागांवर मिळवला विजय
माघारीच्या दिवशी दोन उमेदवारांनी अचानक घेतलेल्या माघारीनंतर भाजपाच्या दोन जागा बिनविरोध झाल्या तर प्रभाग सात अ मधील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार सारीका युवराज पाटील यांच्या अर्जासोबत जोडलेला एबी फार्म हा त्यांचे पती युवराज पुंडलिक पाटील यांच्या नावाचा पक्षाने दिल्यानंतर त्या अपात्र ठरल्याने येथे भाजपाच्या प्रीती मुकेश पाटील या बिनविरोध निवडून आल्या. आतापर्यंत भाजपाने तीन जागांवर मुसंडी मारल्याने भाजपेयींमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे दोन जागांवर महिलांनी यश मिळवले आहे.
उद्यापासून प्रचाराचा धुराळा : आरोप-प्रत्यारोपांच्या झडणार फैरी
उमेदवारांच्या माघारीनंतर खर्या अर्थाने शनिवार, 22 रोजी निवडणुकीचा आखाडा शहरात तापणार आहे. सत्ताधारी व विरोधक नेत्यांच्या सभेतील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी या निमित्ताने झडणार आहे. शहरातील अमृत योजना, पाणी, रस्ते, ठेकेदारी आदी मुद्दे प्रचारात चर्चेत राहणार आहेत.


