भुसावळ पालिकेत सत्ता द्या ; सर्व व्यवहार ऑनलाईन जाहीर करून पारदर्शकता आणणार ! : मंत्री संजय सावकारे यांची ग्वाही
भुसावळ (1 डिसेंबर 2025) : केंद्रासह राज्यात सरकार आमचेच असल्याने शहराच्या विकासासाठी निधीही कमतरता भासू देणार नाही, शहरात विकासाची कामे प्रगतीपथावर असून प्रलंबित कामे आचारसंहिता संपताच सुरू होणार आहे. भुसावळच्या विकासासाठी प्रभाग क्रमांक 14 मधील भाजपा उमेदवारांसह नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रजनी सावकारे यांना प्रचंड मतांनी निवडून द्या, असे आवाहन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी प्रभागात आयोजित जाहीर सभेत केले.
राज्यासह केंद्र सरकार आमचेच
मंत्री संजय सावकारे म्हणाले की, केंद्रासह राज्यात भाजपाचे सरकार असल्याने निधी आणण्याची कुठलीही अडचण नाही. भुसावळातील 70 टक्के रस्त्यांचे अंतर्गत काँक्रिटीकरण झाले असून आचारसंहिता संपताच जामनेर रोडच्या काँक्रिटीकरणाला सुरुवात होईल. अनेक प्रलंबित कामांनाही आचारसंहिता संपताच सुरूवात होईल, असे त्यांनी सांगितले.





संपलेल्या पर्वाला जागे करू नका
माजी आमदार संतोष चौधरी व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार टीका यावेळी मंत्री सावकारे यांनी केली. संपलेल्या पर्वाला पुन्हा जागे करू नका अन्यथा पुन्हा खंडणी मागणे, तरुणाईला व्यसनाला लावण्याचे प्रकार होतील, असा आरोपही सावकारे यांनी केला. यांनी शहरात दुकाने बनवल्याची वल्गना केली मात्र प्रत्यक्ष त्या व्यापार्यांना जावून विचारायला हवे की पालिकेत किती भरले व यांना किती दिले ? असेही मंत्री सावकारे म्हणाले. एक रस्ता तीन वेळा बनवला असल्याचा आरोप हे करतात मात्र तक्रार का केली नाही, तक्रार करा मी चौकशीचे आदेश द्यायला लावतो, असेही मंत्री सावकारे म्हणाले. पालिकेची निवडणूक आहे त्यावर बोला वैयक्तिक बोलायला लावू नका, असेही सावकारे म्हणाले.
सर्व आर्थिक व्यवहार जनतेसाठी ऑनलाईन खुले करणार
भुसावळ पालिकेत भाजपाला सत्ता दिल्यास सर्व आर्थिक व्यवहार खुले करणार असल्याचे ते म्हणाले. परवानग्यांसाठी कुणाचीही अडवणूक होणार नाही शिवाय किती पैसा आला व गेला हे जनतेसाठी ऑनलाईन खुले करणार असल्याचेही ते म्हणाले.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
मंत्री संजय सावकारे, भाजपा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.रजनी सावकारे, भाजपाचे प्रभाग 14 अ चे उमेदवार राजेंद्र आवटे, ब च्या उमेदवार अंकिता खोले-पाटील, उद्योजक मनोज बियाणी, हॉटेल व्यावसायीक व समाजसेवक सारंगधर पाटील, मनीष सारंगधर पाटील आदींची उपस्थिती होती.
