प्रभाग नऊमधील बेरोजगारांना रोजगार, प्रत्येक घरावर सौर पॅनलसह घरोघरी रेशन उपलब्ध करणार : राष्ट्रवादी उमेदवार ममता डागोर यांची ग्वाही


भुसावळ (1 डिसेंबर 2025) : भुसावळातील प्रभाग क्रमांक नऊमधील रहिवाशांना दर महिन्याला घरपोच रेशन व्यवस्था करण्यासह पाण्याचा प्रश्न सोडवू तसेच बेरोजगारांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही या प्रभागातील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार ममता डागोर यांनी दिली. यावेळी उमेदवाराचे पती समाजसेवक अजय कुमार डागोर यांनी वचननाम्याचे वाचन केले. प्रभागातील प्रचार कार्यालयाजवळ सोमवारी दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद झाली.

प्रत्येकाला रोजगार हेच वचन
उमेदवाराचे पती अजय डागोर म्हणाले की, नागरिकांनी ममता डागोर यांना निवडून दिल्यानंतर प्रभागातील स्थिती पाहता या भागात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढली असल्याने प्रत्येक बेरोजगार युवकाच्या हाताला काम मिळावे या भावनेतून काम करण्यात येईल शिवाय शिवाय नगरपालिकेत कॅज्युअल लेबर बेस भरती करण्यात येईल.

प्रभागात अमृत योजना पोहोचली नसल्याने प्रत्येकाच्या दारापर्यंत नळ आणण्यासह तूर्त विविध ठिकाणी बोअरवेल करण्यावर आपला भर असेल शिवाय वाढत्या लाईट बिलाला पर्याय म्हणून प्रत्येक नागरिकाच्या छतावर (कायमस्वरुपी घरे असणार्‍यांसाठी) सौर पॅनल बसवण्यात येईल व या माध्यमातून वीज बिल कमी होईल.

प्रभागातील प्रत्येक मुलीच्या लग्नासाठी योगदान दिले जाईल व यासाठी लेबर कार्ड योजनेद्वारे निधी देण्यात येईल. महात्मा फुले नगरातील काही भागात विविध बँकांनी लोन देण्यासाठी ब्लॅक लिस्ट केल्याने त्याबाबत सकारात्मक दखल घेवून पाठपुरावा केला जाईल जेणेकरून तरुणांना विविध बँकांची कर्ज मंजूर होवून त्यांना स्वयंरोजगार करता येईल.

प्रभागात स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करण्यासाठी मुला-मुलींसाठी ग्रंथालय सुरू करून प्रशिक्षण मोफत दिले जाईल. प्रभागात पशू पालनासाठी मोफत रुग्णालयाची व्यवस्था तसेच गरजूंना घरकुलांचा लाभ तसेच लघू उद्योगांसाठी मोफत अभ्यासक्रम सुरू करण्याचा मनोदय अजय डागोर यांनी व्यक्त केला.

यावेळी उमेदवार ममता अजय डागोर, उमेदवाराचे पती व समाजसेवक अजय कुमार डागोर, प्रवीण सोनवणे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !