पालिका निवडणूक : मद्य दुकाने 2 रोजी दिवसभर तर 3 रोजी निकाल जाहीर होईपर्यंत राहणार बंद
भुसावळ (2 डिसेंबर 2025) : पालिका निवडणुकीचे मतदान असल्याने शहरात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारू विक्री साठी कठोर आदेश लागू केले आहेत. शहरातील सर्व देशी-विदेशी दारू दुकाने, बिअर शॉपी आणि परमिट रूम दि. 1 आणि 2 डिसेंबर रोजी संपूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बुधवार, 3 डिसेंबर रोजी मतमोजणीचा निकाल जाहीर होईपर्यंत कोणत्याही प्रकारची विक्री करण्यास सक्त मनाई आहे. निकालानंतर दुकाने नियमितपणे सुरू होतील, अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक रमेश राठोड यांनी दिली.
अडीच दिवस दारू विक्री बंद
शहरातील अडीच दिवस दारू विक्री बंद राहणार असल्याची माहिती मिळताच रविवारी शहरातील जवळपास सर्व दारू दुकानांवर गर्दी झाली. सकाळपासूनच अनेक ग्राहक दुकानांवर पोहोचले होते. संध्याकाळी तर एकीकडे निवडणुकीची तयारी जोरात असताना दुसरीकडे दारू दुकाने मद्यपींनी भरून गेली होती. शहरातील प्रमुख रस्त्यांवर असलेल्या बहुतेक दुकानांसमोर गर्दी, वाहनांची पार्किंग समस्या आणि रांगा दिसत होत्या. काही जणांनी तर पुढील दोन ते तीन दिवसांचा पुरेसा स्टॉक घरी ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याचे दुकानचालकांनी सांगितले.
आदेशाचे पालन न झाल्यास कारवाई
निवडणुकीदरम्यान अनुशासनातीत घटना टाळण्यासाठी आणि शांतता राखण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे. आदेशांचे पालन न करणार्या दुकानचालकांवर कठोर कारवाई केली जाईल, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथके शहरात तीन दिवस फिरणार आहे. असेही विभागाकडून सांगण्यात आले. याबाबत पोलिस विभागही सजग आहेत.
उद्या निकाल जाहीर झाल्यानंतर दुकाने होणार सुरू
दारू दुकानांवर, गोदामांवर आणि संभाव्य संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निवडणुकीदरम्यान शांतता अबाधित ठेवणे आणि कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 3 डिसेंबरला मतमोजणी पूर्ण होऊन निकाल जाहीर झाल्यानंतरच दारू दुकाने नेहमीप्रमाणे सुरू होतील. असे निरीक्षक राठोड यांनी सांगितले मात्र ग्रामीण भागातील दुकाने सुरू राहणार आहे, यामुळे शहरालगत असलेल्या दुकानांमधून मद्यपी बाटल्या आणण्याची शक्यता नाकारता येत नाही.


