भुसावळातील शहरबंदी तसेच हद्दपार झालेल्या उपद्रवींवर पोलिसांची कडक नजर
भुसावळ पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र पथक सक्रिय
भुसावळ (2 डिसेंबर 2025) : नगरपालिका निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान होत असताना कायदा-सुव्यवस्थेला प्राधान्य देत भुसावळ पोलिसांनी शहरबंदी आणि हद्दपार उपद्रवींवर विशेष लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून स्वतंत्र पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. हे पथक शहरभर गस्त वाढवून संशयितांवर लक्ष ठेवत आहे, अशी माहिती डीवायएसपी संदीप गावीत यांनी दिली.
उपद्रवी दिसल्यास होणार कारवाई
शहरबंदी किंवा हद्दपारीची कारवाई झाल्यानंतरही काही उपद्रवी व्यक्ती गुप्तरित्या शहरात वास्तव करत असल्याची शक्यता लक्षात घेऊन या पथकाने यादीतील सर्व व्यक्तींची पडताळणी सुरू केली आहे. संबंधितांच्या हालचाली, वास्तव्य, त्यांचे संपर्क आणि निवडणुकीच्या दिवशी उपस्थिती याबाबत पोलिस पथक स्वतंत्ररीत्या माहिती गोळा करत आहे. निवडणुकीच्या काळात संवेदनशील भागांमध्ये गस्त, पेट्रोलिंग आणि चौकशी सुरू असून पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, शहरबंदी किंवा हद्दपार असलेली कोणतीही व्यक्ती शहरात दिसल्यास तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
निवडणूक शांततेत आणि निर्विघ्न पार पडण्यासाठी पोलिसांची ही मोहीम सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच पालिका निवडणूकीसाठी शहरबंदी केलेल्या व्यक्तीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या आहे, आदेशाचे उल्लंघन केल्यास त्याच्याविरूध्द थेट गुन्हा दाखल करण्याच्यास सूचना डीवायएसपी गावीत यांनी दिल्या आहे. निरीक्षक उध्दव ठाकरे, निरीक्षक राहूल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली त्या-त्या पोलिस ठाण्यातील पोलिसांचे पथक सक्रीय झाले आहे.


