भुसावळात पोलिसांकडून मुख्य मार्गांवर नाकाबंदी : 97 वाहनांची तपासणी
भुसावळ (2 डिसेंबर 2025) : पालिका निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर पोलिसांकडून शहरातील मुख्य रस्त्यांवर येणार्या-जाणार्या वाहनांची तपासणी केली जात आहे. पोलिसांकडून वाहन तपासणी करतांना विना परवाना गाडी चालविणे, कागदपत्रे नसणे, तीन सीट बसविणे अश्या वाहनधारकांना दंड केला जात आहे. यामुळे वाहनधारकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी 97 वाहनांची तपासणी केली, त्यांना ऑनलाईन दंड करण्यात आला.
मतदानाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा अलर्ट
पालिका निवडणूकीसाठी मंगळवारी मतदान होणार आहे. या पार्श्वभुमीवर पोलिस यंत्रणा अलर्ट झाली आहे. शहरातील यावल रोड, वाय पॉईंट येथे शहरात येणार्या वाहनांची कसून तपासणी केली जात होती. डीवायएसपी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक उमेश महाले व त्यांच्या सहकार्यांकडून व पोलिसांकडून शहरात येत असलेल्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.
विशेष करून चारचाकी वाहने थांबवून चालकाचे नाव, गाव, गाडी नंबर कुठून आले, कुठे जात आहे याची नोंद केली जात आहे. पोलिसांकडून वाहनांच्या डीक्कीची तपासणी केली जात आहे. यामुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहर पोलिस व बाजारपेठ पोलिसांकडून सुध्दा वाहनांची तपासणी केली जात असल्याचे डीवायएसपी गावीत यांनी सांगितले.


