राज्यातील पालिका निवडणुकांसाठी आज मतदान मात्र निकाल कधी लागणार ? उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष


मुंबई (2 डिसेंबर 2025) : राज्यात पालिका निवडणुकीसाठी मतदानाला सुरूवात झाली असून 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होण्याची अपेक्षा असताना अलीकडेच निवडणूक आयोगाने हरकतींवर निकाल उशिराने आल्याने तेथे सुधारीत निवडणूक कार्यक्रम घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार येथे 20 डिसेंबरला निवडणूक तर 21 रोजी मतमोजणी होणार आहे.

या पार्श्वभूमीवर आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एका ठिकाणी 21 डिसेंबरला तर दुसरीकडे 3 डिसेंबरला निकाल, अशा दुहेरी तारखांमुळे जनतेला काय माहिती घ्यायची? असा प्रश्न केला असून 21 डिसेंबरला सर्व संस्थांचे निकाल लावता येतील का? अशी विचारणा खंडपीठाचे न्या.विभा कंकणवाडी व न्या.हितेश वेणेगावकर यांनी केली आहे. यावर निवडणूक विभागाचे वकील अ‍ॅड.सचिंद्र शेट्ये यांनी या संदर्भातील निवेदन मंगळवार, 2 डिसेंबर रोजी 12.30 वाजता करण्यात येईल, असे सांगितल्याने आता निकालाकडे लक्ष लागले आहे.

उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये बेचैनी
मतमोजणीचा दिवसच निश्चित नसल्याने उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये मात्र बेचैनीचे वातावरण आहे. मतदारांनी दाखवलेला विश्वास नेमका कधी उघड होणार? निवडणूक आयोग पुन्हा कार्यक्रमात बदल करणार का? न्यायालयाचा आदेश कोणत्या दिशेने वळणार? या प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत राजकीय तणाव वाढत जाण्याचीच शक्यता आहे. मंगळवारी दुपारी निवडणूक आयोग काय निवेदन देतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

काय घडले खंडपीठात
खंडपीठाने सोमवारच्या सुनावणीत निवडणूक आयोगाच्या वकिलांना थेट विचारणा केली, सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल 21 डिसेंबरलाच देता येतील का? न्यायालयाने विचारलेल्या या प्रश्नामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. आयोगाच्या वकिलांनी मात्र यावर तत्काळ उत्तर न देता, मंगळवारी दुपारी यासंदर्भातील निवेदन सादर करू, असे सांगितले आहे. म्हणजेच आजच निर्णय स्पष्ट होण्याची शक्यता आहे. न्यायालयाने सांगितले की, ज्या ठिकाणी तयारी पूर्ण असून मतदान होणार आहे, तिथे निवडणूक निर्विघ्नपणे होऊ द्यावी मात्र निकालाच्या तारखेवरचा अंतिम निर्णय न्यायालयाच्याच शब्दात बांधला जाईल, हे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 8 ते 10 वर्षांनंतर होत असल्याने मतदारांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. आज राज्यातील 264 नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी मतदान होत आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी मतदानाची वेळ असून, यासाठी 12 हजार 316 मतदान केंद्रांवर 62 हजार 108 अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !