धुळ्यातील गुरुद्वारा प्रमुखावर सेवकाचा तलवारीने हल्ला
A servant attacked the head of a Gurudwara in Dhule with a sword धुळे (2 डिसेंबर 2025) : धुळ्यातील गुरुद्वाराचे प्रमुख धीरजसिंग पुरणसिंग खालसा (61) यांच्यावर गुरुद्वारातच काम करणार्या सेवकाने तलवारीने हल्ला चढवला. ही घटना सोमवारी सकाळी साडेआठ वाजता घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली. या हल्ल्यानंतर अन्य सेवेकर्यांनी खालसा यांना वाचवण्याचा प्रयत्न केल्यानंतर संशयीताने त्यांच्यावरही हल्ला केला तर भाविकांनी यावेळी संशयीताला पकडून चांगलाच चोप दिल्याने त्याच्यावरही उपचार सुरू आहेत.
काय घडले धुळ्यात ?
धुळ्यातील गुरुद्वाराचे प्रमुख धीरजसिंग पुरणसिंग खालसा (61) हे धार्मिक पंथातच नव्हे तर सामाजिक कार्यातही अग्रेसर आहेत. मोहाडी शिवारातील महामार्गाला लागून असलेल्या श्री गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरजसिंग हे सोमवारी सकाळी साडेआठ वाजता आपल्या खोलीबाहेर वृत्तपत्र वाचत असताना गुरुद्वारातील सेवेकरी व संशयीत उमेश कैलास माळोदे (22, रा.आडगाव, नाशिक) याने बाबा धीरजसिंग यांच्या डोक्यात व मानेवर तलवारीने तीन वार केले.
मदतीस धावून आलेले गुरुद्वाराचे सहायक प्रबंधक रणवीरसिंग व सुखविंदरसिंग संधू यांच्यावरही उमेशने वार केले. यानंतर पळणार्या उमेशला सुखविंदरसिंग व सरवरसिंग यांनी पकडले. भाविकांनी त्याला चोप दिल्याने उमेशचा हात व पाय फ्रॅक्चर झाला. जखमी बाबा धीरजसिंग यांना रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी रणवीरसिंग खालसा यांच्या तक्रारीवरून उमेश विरुद्ध धुळे शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस अधीक्षकांची धाव
जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे व सहकार्यांनी धाव घेत माहिती जाणली. सीसीटीव्ही फुटेजद्वारे घटनेचा उलगडा केला जात आहे तर संशयीत नाशिकचा रहिवासी असल्याने तेथेदेखील पथक रवाना करण्यात आले आहे. अनपेक्षित घडलेल्या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे.


