मुक्ताईनगरात मंत्री रक्षा खडसे व आमदार चंद्रकांत पाटील भिडले

भाजपचा दडपशाहीचा, शिवसेनेचा बोगस मतदानाचा आरोप


मुक्ताईनगर (3 डिसेंबर 2025) : जिल्ह्यातील चुरशीची लढत असलेल्या मुक्ताईनगरात निवडणुकीदरम्यान अभूतपूर्व गोंधळ दिसून आला. प्रभाग क्रमांक 17 मधील आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलच्या मतदान केंद्रावर भाजप खासदार रक्षा खडसे आणि शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील आमनेसामने येताच दोन्ही गटांत जोरदार खडाजंगी झाली. भाजपने मारहाणीचा आणि दडपशाहीचा आरोप केला, तर बाहेरून माणसे आणून बोगस मतदान करत असल्याचा शिवसेनेने दावा केल्याने केंद्रावर तणाव निर्माण झाला.

रक्षा खडसेंनी सुनावले, दादागिरी खपवून घेणार नाही
खासदार रक्षा खडसे यांनी आक्रमक होत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचे सांगत उमेदवारांना मतदान केंद्रात जाण्यापासून रोखले जात आहे. ही कसली लोकशाही? एव्हढी दादागिरी आणि दडपशाही आम्ही खपवून घेणार नाही, असा संताप केला. पोलिस प्रशासनाला जाब विचारत या प्रकाराची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बोगस मतदान रोखणे गुंडगिरी आहे का?
याचवेळी आमदार चंद्रकांत पाटील कार्यकर्त्यांसह केंद्रावर धडकले. त्यांनी खडसेंचे सर्व आरोप फेटाळून लावत त्यांच्यावरच पलटवार केला. पाटील म्हणाले, मलकापूरवरून माणसे आणून, त्यांचे बोगस आयडी कार्ड बनवून मतदान करवून घेणे ही दादागिरी नाही का? आम्ही या बोगस मतदानाविरोधात आवाज उठवला, तर आम्हाला गुंड ठरवले जात आहे. केंद्रीय मंत्री असूनही तुम्ही इथे याचना करत आहात? तुम्ही जमिनी बळकावल्या, लोकांचे केबल कनेक्शन तोडले, ती खरी गुंडगिरी आहे, असा घणाघात चंद्रकांत पाटलांनी केला.

पोलिसांची मोठी धावपळ
मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात हा वाद विकोपाला गेल्याने पोलिसांची मोठी धावपळ झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना मतदान केंद्राबाहेर काढले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !