वरणगावात मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला : 73 टक्के मतदान कुणाच्या पथ्यावर ! 21 रोजी निकालाअंती स्पष्ट होणार चित्र


वरणगाव (3 डिसेंबर 2025) : वरणगाव नगरपालिका निवडणुकीसाठी अत्यंत चुरशीच्या वातावरणात निवडणूक पार पडली तर मंगळवारी सायंकाळी साडेपाच पर्यंत 72.75 टक्के मतदान झाले. सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी उशिरापर्यंत प्रक्रिया सुरळीत सुरू होती. एकूण 31 केंद्रांवर मतदानाची व्यवस्था होती. त्यापैकी सहा प्रभागातील 14 बूथवर मतदानाची वेळ संपल्यानंतर म्हणजेच सायंकाळी 5.30 वाजेनंतर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

21 नगरसेवक पदासाठी निवडणूक
वरणगाव येथे लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि 21 नगरसेवक पदासाठी निवडणूक होती. प्रभाग क्रमांक 10 मधील नगरसेवक पदाच्या दोन्ही जागांबाबत अपिल दाखल झाल्याने आयोगाच्या आदेशानुसार येथे आता 20 रोजी निवडणूक होईल त्यामुळे मंगळवारी लोकनियुक्त नगराध्यक्ष व 19 नगरसेवक निवडीसाठी मतदान घेण्यात आले. शहरातील 26 हजार 97 मतदारांपैकी 18,975 मतदान झाले. त्यात पुरूष 9830 तर 9145 महिला मतदारांनी हक्क बजावला.

सुनील काळे यांची बंडखोरी भाजपासाठी डोकेदुखी
शहरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या अंतर्गत बंडाळीने वातावरण ढवळून निघाले होते. सुनील काळे यांना पक्षातर्फे तिकीट न मिळाल्याने त्यांनी बंडखोरीचा मार्ग अवलंबला त्यामुळे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना स्वतः शहरात येऊन सभा घ्याव्या लागल्या तर तिरंगी लढत अनेक आरोप-प्रत्यारोप झाले मात्र मतदार आता कुणाच्या पारड्यात निकाल टाकतात हे 21 डिसेंबरच्या निकालाअंती स्पष्ट होणार आहे.

लक्ष्मी दर्शनाची चर्चा : दुपारनंतर मतदान केंद्रावर रांगा
जिल्हा परिषद शाळा वरणगाव व सिद्धेश्वर नगर तसेच गंगाधर सांडू चौधरी माध्यमिक विद्यालयातील बुथवर मंगळवारी दुपारी तीन नंतर प्रचंड प्रमाणावर गर्दी झाली व दूरवर रांगा लागल्या होत्या. दुपारी लक्ष्मीदर्शन झाल्याची चर्चाही यावेळी रंगली.

सिद्धेश्वर नगरातील केंद्रावर तणाव
सिद्धेश्वर नगरातील मतदान केंद्रावर भाजपाला मतदान करण्याबाबत संबंधित अधिकारी संकेत करीत असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार राजेंद्र चौधरी यांनी करीत संबंधित अधिकार्‍यांची नावे देत त्यांना बडतर्फ करण्याची मागणी जिल्हाधिकारी तसेच निवडणूक विभागाकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे. या केंद्रावर पुर्नमतदान घेण्याची मागणीही त्यांनी केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !