भुसावळ पालिकेसाठी चुरशीची निवडणूक : 55 टक्के मतदान

240 उमेदवारांपैकी कौल कुणाला ? 21 रोजीच्या निकालानंतर स्पष्ट होणार चित्र


Tight election for Bhusawal Municipality : 55 percent voting भुसावळ (3 डिसेंबर 2025) : तब्बल नऊ वर्षांनी झालेल्या भुसावळ नगरपालिका निवडणुकीसाठी यंदा मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. मंगळवार, 2 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजेपासूनच मतदार शहरातील विविध मतदान केंद्रावर रांगा लावून असल्याचे दिसून आले तर मतदार यादीतील घोळामुळे तसेच मतदारांचे प्रभाग बदलल्यामुळे मतदारांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागला. शहरात निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडली व कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार भुसावळात पालिका निवडणुकीसाठी सुमारे 54.91 टक्के मतदान झाले. 25 प्रभागातील 44 जागांसाठी 232 उमेदवार निवडणूक रिंगणात होते व मतदारांचा कौल आता कुणाच्या बाजूने असेल ? हे आता रविवार, 21 डिसेंबरच्या निकालानंतर समोर येणार आहे.

सकाळपासूनच निवडणुकीसाठी उत्साह
तब्बल नऊ वर्षानंतर होणार्‍या भुसावळातील निवडणुकीसाठी मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. निवडणूक विभागाच्या माहितीनुसार, शहराची एकूण मतदारसंख्या एक लाख 78 हजार 780 असून त्यात 90 हजार 889 पुरूष तर 87 हजार 854 स्त्री मतदार आहेत. भुसावळ पालिका निवडणुकीसाठी शहरात 191 मतदान केंद्र होते. शहरातील खडका रोड, शांती नगर, जामनेर रोड आदी भागातील मतदान केंद्रावर सकाळपासून मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले.

मतदार यादीतील घोळामुळे मतदारांचा संताप
विधानसभा निवडणुकीप्रमाणेच यंदा पालिका निवडणुकीतही मतदान यादीतून अनेक मतदारांची नावे गायब असल्याने त्यांचा संताप झाला तर बीएलओ यांनी मतदारांपर्यंत व्होटर स्लीप दिलीच नसल्याने मतदारांनी या प्रकाराविषयी रोष व्यक्त केला. अनेक मतदारांची नावे अन्य प्रभागात गेल्याने मतदारांचा हिरमोड झाल्याचे दिसून आले.

मतदान केंद्रावर सुविधांचा अभाव
भुसावळात अनेक मतदान केंद्रावर मतदारांना सुविधांचा अभाव जाणवला. अनेक वेळ रांगेत उभे राहून मतदारांना पाण्याची व्यवस्थाही नसल्याने तसेच मंडपाचीही व्यवस्था नसल्याने मतदारांनी नाराजी व्यक्त केली तर जळगाव रोडवरील शाळा क्रमांक एकमध्ये सकाळी वीज गुल होताच अंधार पसरला मात्र जनरेटची व्यवस्था येथे दिसून आली नाही तर काही वेळेनंतर वीज आल्यानंतर मतदारांना दिलासा मिळाला.

या मुद्यांवर गाजली निवडणूक
भुसावळची निवडणूक रखडलेली अमृत योजना, शहरातील गुन्हेगारी, पालिका हद्दवाढ, शहरातील सर्वदूर साचलेला कचरा, बंद असलेले पथदिवे आदी मुद्यांवर प्रकर्षान गाजली.

भुसावळात भाजपाची सत्ता : मंत्री संजय सावकारे
भुसावळकरांनी मतदारांनी शांततेत मतदान केले, कुठेही अनुचित प्रकार घडला नाही तसेच सर्व पक्षीय लोकांचेही यासाठी मी अभिनंदन करतो. पालिका निवडणुकीत भाजपा सत्ता येईल व नगराध्यक्ष आमचा होईल, असा विश्वास असल्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी सांगितले.

विजयाचा विश्वास : रजनी सावकारे
भुसावळकरांनी लोकशाहिच्या उत्साहात सहभाग घेवून उत्स्फूर्तपणे मतदान केले. भाजपाला बहुमत मिळेल व भाजपाची सत्ता स्थापन होईल हा विश्वास आहे शिवाय नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपला विजय होईल, हा विश्वास असल्याचे भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रजनी संजय सावकारे यांनी सांगितले.

गायत्री भंगाळे यांचा विजय निश्चित : संतोष चौधरी
भुसावळ शहरात तुतारीचा आवाज घुमला आहे. भुसावळकर जनतेने नऊ वर्षांचा राग मतदानातून काढला असून पाण्यासाठी नऊ वर्ष तरसलेले नागरिक यांना पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही. 15 हजारांच्या मताधिक्क्याने आमच्या उमेदवार गायत्री भंगाळे या निवडून येतील, असा विश्वास असल्याचे भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी म्हणाले.

आमच्या उमेदवाराचा विजय होणार : नाथाभाऊ
भुसावळात पालिका निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. कोण निवडून येईल हे आजच सांगणे कठीण असले तरी आमच्या तुतारीच्या उमेदवार गायत्री भंगाळे या निवडून येतील, असा विश्वास असल्याचे आमदार एकनाथराव खडसे म्हणाले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !